भोसरी विधानसभेवर शिवसेनेचाच दावा

0

पिंपरी :- आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार असेच चित्र आहे. पहिल्यापासून पुणे जिल्ह्यात शिवसेनेची चांगली ताकत आहे. एखाद्या निवडणुकीत अपयश मिळते. लोकसभेत जरी पराभूत झालो असलो तरी, शिवसेनेला चांगले मतदान झाले आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघ मुळचा शिवसेनेकडेच आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत युती असताना भोसरी शिवसेनेच्या वाट्याला होती. २०१४ मध्ये सेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालीत. येथून पूर्वी शिवसेनेचा खासदार, आमदार निवडून आला आहे. आता युती झाल्यास या मतदारसंघावर शिवसेनाच दावा करणार आहे. पुण्यातही ८ जागा भाजपा मागत आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का? असा सवाल शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलायं.भोसरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, पुण्यात देखील शिवसेनेचा एकही आमदार नसला तरी शिवसेनेची ताकद मोठी आहे. राज्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी मधून मोठे नेत्यांचे शिवसेना भाजप प्रवेश सुरू आहेत. इंदापूर तिथे सुद्धा काँग्रेसमधील एका बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश होणार आहे. मात्र ती मूळची जागा शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत काही जागा भाजपाने आम्हाला देखील सोडाव्यात. पुण्यात सध्या आठही जागांवर भाजपा दावा करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेच उचलायचे का? भोसरीसह शिरूर, हडपसर विधानसभांची जागा शिवसेनेला मिळालीच पाहिजे.

कामगार नेते इरफान सय्यद आणि धनंजय आल्हाट इच्छुक – भाजपने भोसरीसह जुन्नर, आंबेगाव, खेड मधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता उद्या मुंबईत शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. भोसरीमधून कामगार नेते इरफान सय्यद आणि धनंजय आल्हाट इच्छुक आहेत. यांच्या देखील उद्या मुंबईत मुलाखती होणार आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभेवर शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. शेवटी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील ‘तो’ आम्हाला मान्य असणार आहे. परंतु शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून चालणार नाही. ज्या पध्दतीने भाजप चिंचवड आणि भोसरीवर दावा करत आहे, त्याचप्रमाणे आम्ही भोसरीवर दावा करतोय. युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला गेलीच तर, आम्ही सर्वजण युतीच्या उमेदवाराचे काम करणार आहोत. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आलेत. ते सध्या भाजपाकडून इच्छुक आहेत. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी शिवसेनेत यावे आणि शिवसेनेकडून ही निवडणूक लढवावी असेही शेवटी आढळराव पाटील बोलताना म्हणाले.