भौगोलिक रचनेनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया, पुनर्वापरासाठीचा आराखडा तयार

0
विधी समितीची मान्यता; 20 डिसेंबरच्या महासभेत प्रस्ताव 
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात दररोज 312 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते. नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असून सांडपाण्यावर प्रक्रिया, पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर करण्यासाठी शहराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच भौगोलिक रचनेनुसार शहराचा चार भागात विभागणी केली असून पहिल्या टप्प्यातील पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी आणि चिंचवड एमआयडीसीचा स्मार्ट सिटीच्या एरिया बेस डेव्हलमेंटमध्ये समावेश केला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया, पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर धोरणास विधी समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. 20 डिसेंबरच्या महासभेपुढे हे धोरण ठेवण्यात येणार आहे.
दिवसाला 312 दशलक्ष लिटर सांडपाणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यातील सुमारे 312 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात जलस्त्रोत निर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन व नियोजनपुर्ण वापर ही काळाची गरज आहे. महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या 30 ते 50 टक्के पर्यंत पाणी वापर सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याने पुर्नचक्रीकरण व पुर्नवापरच्या माध्यमातून करणे, शहरातील एमआयडीसी अखत्यारीत औद्योगिक विभाग, हिंजवडी, चाकण, तळवडे या भागात प्राधान्याने पाणी पुरवठा करुन बचत होणारे पाणी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी दिली.
अंदाजित चारशे कोटींचा खर्च…
शहर आराखड्यात भौगोलिक रचनेनुसार चार विभाग पाडण्यात आले असून पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड एमआयडीसीचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतील एरिया बेस डेव्हलमेंटमध्ये पहिला टप्यांचा समावेश करुन हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रतिदिन 75 दशलक्ष लिटर प्रक्रियेचे केंद्र कासारवाडीत उभारण्यात येत आहे. दुसर्‍या टप्प्यात चिखली एमआयडीसीत 5 दशलक्ष लिटर प्रक्रिया केंद्र उभारणे, तिसर्‍या टप्प्यात निगडी प्राधिकरण, तळेगाव एमआयडीसी आणि चौथ्या टप्प्यात चाकण एमआयडीसी समावेश आहे. सदरील योजनेंचा अंदाजित खर्च सुमारे चारशे कोटी इतका असणार आहे.
उद्याने, पार्क, खेळाच्या मैदानांसाठी पुर्नवापर…
या पाण्याचा पुर्नवापर हा औष्णिक विदुयत केंद्राना प्रक्रियायुक्तपाणी पुरविण्यास, एमआयडीसीतील प्रक्रियायुक्त पाणी पुरविण्यास, रेल्वे किंवा अन्य मोठ्या प्रमाणात खरेदीदार यांना प्रक्रियायुक्त पाणी पुरविण्यास, शहरातील बांधकाम व्यावसायिक, सव्हीस सेंटर, लॉन्ड्रीज, इतर व्यावसायिक इमारती, कुर्लींग टॉवर, हौसिंग सोसायट्यांना, विविध उद्याने, पार्क, खेळाची मैदाने, कृषी प्रयोजनार्थ पाणी तसेच पिण्यास योग्य नसलेल्या घटकांसाठी पाण्यासाठी पुर्नवापर करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य पाण्याचा पुर्नवापर बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, लोक सहभागातून (पीपीपी) पुर्नचक्रीकरण, पुर्नवापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणी करण्यात येणार आहे.