धुळे । बँकेचे व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून तीन वेळेस ओटीपी नंबर घेऊन येथील डॉक्टरच्या खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तोतया बँक व्यवस्थापकाने डॉक्टरांकडून ओटीपी नंबर घेऊन 49 हजार 996 रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी चौथ्या वेळेस नंबर दिला नाही म्हणून भ्रमणध्वनीवरून शिविगाळ करून धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तीन वेळा घेतला ओटीपी नंबर
शहरातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्वार्टर नं़ 3 मध्ये राहणारे डॉ़ शिवेंद्रकुमार सिंघल (वय 61) यांना मंगळवारी सायंकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका फोन आला़ मी बँकेचा व्यवस्थापक बोलत आहे, अशी बतावणी केली़ त्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेल्या ओटीपी नंबर तीन वेळा घेऊन त्यांच्या जॉईंट बँक खात्यातून 49 हजार 996 रूपये काढून फसवणूक केली़
भ्रमणध्वनीद्वारे शिवीगाळ, धमकी
त्यानंतर पुन्हा सिंघल यांच्याकडून चौथ्या वेळेस ओ़टी़पी क्रमांकाची मागणी केली़ तेव्हा नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमध्वणीवरून शिवीगाळ करून धमकी दिली़ हा प्रकार मंगळवारी सायंकाळी 5़57 ते 6़57 या एक तासातच घडला़ याबाबत डॉ़ शिवेंद्रकुमार सिंघल यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम 420, 507 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.