भ्रष्टाचाराला मुळासकट उपटण्यासाठी युवा पिढीने अभियानात नोंदवावा सहभाग

0

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर ; भुसावळातील भोळे महाविद्यालयात कार्यशाळा

भुसावळ- प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार मुळासकट उपटून फेकण्यासाठी युवा पिढीने भ्रष्टाचारविरोधी अभियानात सहभागी होणे काळाची गरज असून त्यानंतरच परीस्थितीत सुधारणा होईल, असा विश्‍वास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी येथे केले. शहरातील दे.ना.भोळे महाविद्यालयात भ्रष्टाचार दक्षता प्रबोधन सप्ताहनिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

वाढत्या भ्रष्टाचाराने विश्‍वास होतोय लुप्त
गोपाळ ठाकूर पुढे म्हणाले की, प्रशासनातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य नागरीकांचा अधिकारी व कर्मचार्‍यांवरील विश्वास लुप्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेची व्यापक प्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या कायदेविषयक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक निलेश लोधी होते.

भ्रष्टाचार समूळ नायनाटसाठी व्हावे प्रयत्न -निलेश लोधी
समाजात वाढणारा भ्रष्टाचार कमी करावयाचा असेल तर लाच म्हणून पैशांचा व्यवहार करणार्‍यांना आपण मज्जाव घालावा. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी. आजची तरूण पिढी देशाचे भवितव्य घडवणारी आहे. यासाठी भ्रष्टाचाराचा समूळ नाइनाट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक निलेश लोधी यांनी केले. भ्रष्टाचारत पैसे देणारा व घेणारा हे दोन्ही दोषी असून अशा घटनांची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड -प्राचार्य
प्राचार्य आर.पी.फालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली किड आहे. ही किड मिटवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी डॉ.जगदीश चव्हाण, भारती बेंडाळे, डॉ.शोभा चौधरी, डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.अनिल सावळे, प्रा.जयश्री सरोदे, डॉ.कांता भाला, डॉ.जी.पी. वाघुळदे, डॉ.आर.बी. ढाके यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संजय बाविस्कर यांनी तसेच सूत्रसंचालन प्रा.श्रेया चौधरी तर आभार संगीता धर्माधिकारी यांनी मानले.