नंदुरबार । आमचा विकास कामांना नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध आहे, असे स्पष्ट करतांनाच नगरपालिकेतील भ्रष्टाचाराला ज्या-ज्या नगरसेवकांनी सहकार्य केले आहे, असे नगरसेवक लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला. नगरपालिकेच्या व्यापारी संकुल उद्घाटनप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या वक्तव्याचा विजय चौधरी यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, व्यापारी गाळ्यांचा लिलाव बेकायदेशीर झाला असून त्या व्यापारी गाळ्यांच्या उद्घाटनाला भाजपाचे पालकमंत्री कसे येतील? ज्या कमला मराठे यांनी आयुष्यभर आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या धोरणाला विरोध केला होता, मग आता त्यांचे नाव व्यापारी संकुलात देण्याचा हेतू तरी काय? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. सर्वत्र काँग्रेसचा सफाया होत आहे. त्यामुळे आ.रघुवंशी भाजप-शिवसेना नेत्यांशी जवळीक साधून भ्रष्टाचारापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नगरपालिकेवर आ.रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे.