मुंबईच्या सेना भाजप युती सरकारच्या काळात शिवशाही योजना सुरू झाली ती झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी. पुढे ती योजना एसआरएच्या नावाने ओळखली जाऊ लागली. या योजनेचा उद्देश जरी झोपडपट्टीवासीयांना चांगली घरे देणं असलं तरी प्रत्यक्षात ही योजना बिल्डरांना मुंबईतील मोक्याच्या जागा विकसित करून पैसा कमवण्यासाठीच झाला आहे.
मुंबईतील अनेक प्रकल्पांत अनेक अडचणीही येतात, मग त्या दूर करण्यासाठी एसआरए महापालिका, कलेक्टर कचेरी, पोलीस, गृहनिर्माण मंत्रालय, स्थानिक नगरसेवक, आमदार, लोकल नेते, गुंड या सर्वांना बिल्डर हाताशी धरतो आणी झोपडपट्टीवासीयांवर अन्याय करतो. अशा अन्यायाविरुद्ध लढणे सामान्य माणसाच्या कुवतीबाहेर असते. अशा वेळी संदीप येवले सारखा कार्यकर्ता या सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहतो. मुंबईत असे अनेक संदीप आहेत ते या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात संघर्ष करताहेत, प्राणपणाने लढताहेत अशा सर्वांना संदीपने एक वाट दाखवली आहे. 11 कोटी ही साधी रक्कम नाही, त्यातला पहिला एक कोटींचा हप्ता स्वीकारायचा, अनेक धोके पत्करून ते सारे स्टिंग ऑपरेशनद्वारे माध्यमातून उघड करायचे. ही साधी गोष्ट नाही.प्रामाणिकपणा आणि गरिबांप्रति निष्ठा असल्या शिवाय हे शक्य नाही.
संदीप येवले हा गेल्या 22 वर्षांपासून मुंबईतील विक्रोळी पार्कसाइटमध्ये या सर्व बिल्डर लॉबी आणि त्यांच्या दलालांशी एकटा लढतो आहे. पार्कसाइटमध्ये असे घर नसेल जे संदीप येवलेला ओळखत नाही. अगदी फाटका कार्यकर्ता, मेधा पाटकरांच्या घर बचाओ घर बनाओ आंदोलनात सक्रीय. फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता. वडिलांचे रिटायरमेंटनंतर मिळालेले पैसेही त्याने या आंदोलनात खर्च केले. युवा संस्थेतून मानधन मिळायचे तेही सर्व खर्च करायचा. त्याला मॅनेज करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण तो काही मॅनेज झाला नाही. त्याच्यावर स्थानिक महिलांकरवी हल्ले करवले गेले, खोट्या केसेस टाकल्या, रात्री बेरात्री हल्ले केले, पण डगमगला नाही. आज त्याने एसआरएची अब्रूच वेशीवर टांगली आहे.
त्याने आता खुलेआम बिल्डर, अधिकारी आणि राजकीय नेत्यांना उघडे केले आहे. त्यामुळे या पुढे त्याला काळजी घ्यावी लागेल. पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यावे लागेल, तशी रणनीती कार्यकर्त्यांना ठरवावी लागेल. त्याने केलेल्या आरोपाची दखल घेत तत्काळ चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करून संदीप येवलेला सुरक्षा प्रदान करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आझाद मैदानच्या आंदोलनात येऊन राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
संदीपच्या स्टिंग ऑपरेशनने बिल्डर, राजकारणी आणि अधिकार्यांची अभद्र युती समोर आली आहे. पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो असा मुजोरपणा आणि कुणालाही विकत घेता येते असा ठाम विश्वास असलेल्या या भ्रष्ट व्यवस्थेला संदीपने ही सणसणीत चपराक हाणली आहे. सरकारचीही यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. तशीच ती जबाबदारी आता समाजाची आणि आपली आहे, बिल्डर, राजकारणी यांच्या भ्रष्ट युतीला सामोरं जायचं की आपलं स्वप्नातलं घर उभं करण्यासाठी संदीपच्या वाटेने जायचं, हे ज्याचं त्यानंच ठरवायला हवं.
शरद कदम – 9224576702