भ्रष्टाचार रेल्वे अग्रेसर

0

नवी दिल्ली – केंद्रीय दक्षता आयोगाने विविध सरकारी विभागांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा अहवाल तयार केला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक तक्रारी रेल्वे विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांच्या विरोधात 11 हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून उघडकीस आली आहे.

या अहवालात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भ्रष्टाचाराच्या तक्रारींचे प्रमाण थेट 67 टक्क्यांनी वाढले आहे. सरकारी विभागांमधून 2015 मध्ये 29,838 तक्रारी आल्या होत्या. 2016 मध्ये तक्रारींचा आकडा 49,847 वर पोहोचला असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने अहवालात म्हटले आहे. वर्षभरात तक्रारींमध्ये झालेल्या वाढीचे प्रमाण 67 टक्के इतके आहे. आयोगाला राज्य सरकार आणि अन्य विभागांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळाल्या आहेत, असे केंद्रीय दक्षता आयोगाने म्हटले आहे.

2014 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाकडे 62,363 तक्रारींची नोंद झाली होती. मात्र 2015 मध्ये तक्रारींचा आकडा 29,838 वर आला. 2014 च्या तुलनेत 2015 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारींचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षाही कमी होते. केंद्रीय दक्षता आयोगाला 2013 मध्ये 31,432, तर 2012 मध्ये 37,039 तक्रारी मिळाल्या होत्या.

भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक 11,200 तक्रारी रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. यामधील 8,852 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, तर 2,348 तक्रारी प्रलंबित आहेत. रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधातील 1,054 तक्रारींची प्रकरणे सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत, असे केंद्रीय दक्षता आयोगाने अहवालात म्हटले आहे.

भ्रष्टाचारात गृह मंत्रालयाचा दुसरा क्रमांक
रेल्वे कर्मचार्‍यांनंतर भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी गृह मंत्रालयातील कर्मचार्‍यांविरोधातील दाखल झाल्या आहेत. गृह मंत्रालयातील कर्मचार्‍यांविरोधात भ्रष्टाचाराच्या 6,513 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानंतर बँक कर्मचार्‍यांविरोधात 6,018 भ्रष्टाचाराच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहेत. तर पेट्रोलियम मंत्रालयातील कर्मचार्‍यांविरोधात 2,496 तक्रारींची नोंद झाली आहे.