नवी दिल्ली : देशभरात सर्वाधिक भ्रष्ट्राचार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. या यादीत कर्नाटक पहिल्या स्थानी असून केरळ, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सर्वात कमी भ्रष्ट्राचार होत असल्याचे समोर आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सेंटर फॉर मीडिया स्टडीजने देशभरातील 20 राज्यांमध्ये सर्वेक्षण केले आहे. 3 हजारहून अधिक लोकांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला. यात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश होता. 20 राज्यांमधून 2017 या वर्षात तब्बल 6,350 कोटी रुपयांची लाच दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2005 च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. 2005 मध्ये तब्बल 20, 500 कोटी रुपयांची लाच दिल्याचे समोर आले होते.
दरम्यान, भ्रष्ट्राचारामध्ये कर्नाटक पहिल्या स्थानी असून त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा नंबर लागतो. या यादीत सर्वात तळाला हिमाचल प्रदेश, केरळ आणि छत्तीसगडचा नंबर लागला आहे. तसेच या राज्यांमध्ये सर्वात कमी भ्रष्ट्राचार झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांनी लाच दिल्याची कबूली दिली आहे. सर्वेक्षणातून आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, नोटाबंदीमुळे भ्रष्ट्राचार घटल्याचे लोकांना वाटते. नोटाबंदीनंतर नागरी सेवेतील भ्रष्ट्राचाराचे प्रमाण कमी झाले असे मत अनेकांनी मांडल्याचे अहवालात म्हटले आहे.