भ्रष्ट अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी

0

भुसावळ। दीपनगर वीज निर्मिती केंद्रात वर्षाकाठी करोडोंची उलाढाल होत असून जिल्ह्यासह परराज्यात येथून वीज पुरवठा होतो. असे असले तरी या प्रकल्पात काही भ्रष्टाचारी व हुकुमशाही अधिकारी असल्याने वीज निर्मिती केंद्राचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. येथील खरेदी प्रणाली विभागातील (सीपीएस/आरपी) या विभागात कार्यरत असलेलेे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र गार्गव यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप स्थानिक कंत्राटदार संंघटनेचे अध्यक्ष फिरोज खान पठाण यांनी केला आहे. त्यांनी विज निर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.

लाखो रुपयांची उचल
निवेदनात म्हटले आहे की, गार्गव हे गेल्या अनेक वर्षांपासून दिपनगर येथे कार्यरत आहे. त्यांनी ओएस या विभागात कार्यरत असतांना आपल्या हुकुमशाहीने इम्प्रेस्ट (उचल) लाखो रुपयांची केली असून या कामांचीही चौकशी करावी. तसेच स्थापत्य विभागांतर्गत येणारी कामेही आपल्या विभागातून काढून मलिदा लाटल्याचा प्रकारही समोर आला आहे. हा अधिकारी आपल्या कामातही निष्काळजीपणा करीत असून आवो जावो याप्रमाणे कामावर केव्हाही येत असून याचीही चौकशीची मागणी केली आहे. या अधिकार्‍यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून या अधिकार्‍याची चौकशी केल्यास संपूर्ण पितळ बाहेर येईल. त्याचप्रमाणे या अधिकार्‍याची मुख्य अभियंता यांच्याकडे अवगत व तोंडी तक्रार केली असूनही त्यांच्याविरुध्द कोणतीही कारवाई करण्यास असमर्थता दाखविली जात आहे. महाजेनकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याची चौकशी करुन या अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणीही पठाण यांनी केली आहे.