भ्रष्ट अधिकार्‍यांना अभय

0

पिंपरी-चिंचवड। महापालिकेतील भ्रष्ट अधिकार्‍यांची चौकशी करण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून अहवाल देण्याबाबत विभागीय आयुक्तांनी आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत महापालिका आयुक्तांनी भ्रष्ट अधिकार्‍यांच्या चौकशीबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून, यातून महापालिका आयुक्तांचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

आयुक्तांनी आदेश झुगारले
त्यानुसार विभागीय आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेत त्याबाबत कार्यवाही करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे आदेश दिले होते. प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले. मात्र, महापालिका आयुक्तांनी आदेशाला न जुमानता संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील संबंधित भ्रष्ट अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील अनेक जण लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. यावरून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

विभागीय आयुक्तांना निवेदन
पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील काही अधिकारी भ्रष्ट असून, काही अधिकार्‍यांची कार्यशैली संशयास्पद आहे. अशा अधिकार्‍यांमुळे पारदर्शी कारभार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळातील भ्रष्ट आणि संशयास्पद कार्यशैली असलेल्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी थोरात यांनी केली होती. याबाबत 2 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्या निवदेनाची माहितीसाठीची प्रत विभागीय आयुक्त, लाचलुचपत विभाग, प्राप्तीकर विभाग, आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना देण्यात आली होती.