धुळे । जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकार्यांच्या कारभारावर पंचायत राज समितीच्या सदस्यांनी संताप व्यक्त करत अशा भ्रष्ट अधिकार्यांवर ताबडतोब कारवाई करा असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण यांना समितीच्या सदस्यांनी दिले. बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पंचायत राज समितीच्या सदस्यांची जिल्हा परिषदेतील, पंचायत समितीतील पदाधिकारी,जि.प.चे अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गगांथरण डी. यांनी समितीचे प्रमुख आ.प्रकाश भारसाकळे यांच्यासह अन्यविधान मंडळाचे सदस्यांचे स्वागत केले.
अधिकार्यांची झाडाझडती : यावेळी पंचायत राजच्या सदस्यांनी दांडी बहाद्दर, कामचुकार, लोक प्रतिनिधींना कस्पटासमान समजणार्या अधिकार्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले. जनतेचे राज्य असतांना जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून सेवा बजावणार्या पदाधिकारींचा, अधिकारी अवमान करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांना धडा शिकवावा अशी मागणी पंचायत राज समितीच्या दौर्यात आ. रामहरी रुपनर यांनी समितीच्या अध्यक्षांकडे केली.
लोकप्रतिनिधींचा अवमान नको : विधान मंडळाची पंचायत राजसमिती तीन दिवसाच्या धुळे दौर्यावर आली आहे. या दौर्यात जिल्हा परिषदेअंतर्गत केलेल्या विकास कामांची पाहणी, ग्रामपंचायतींना भेटी देऊन स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येणार आहे. शासकीय योजनांचा लाभ खर्या गरजू लाभार्थ्यांना मिळतो की नाही याबाबत चौकशीदेखील केली जाणार आहे. शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी आ. रामहरी रुपनर यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. धुळे तालुका पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डी. के. पाटील मासिक बैठकांना गैरहजर राहतात. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांकडे दुर्लक्ष करुन अवमान करीत असल्याचा आरोप पंचायत समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी केला. त्यांच्या आरोपाचे समर्थन करुन आ.रामहरी रुपनर चांगलेच संतप्त झाले. अधिकारी हे मग्रुर झाले आहेत, लोकप्रतिनिधींच्या आदेशाचे उलंघन करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पंचायत राज समिती जिल्हा परिषदेच्या सन 2008-09 व 2011-12 चा लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन 2012-13 च्या वार्षिक प्रशासन अहवाला संदर्भात आढावा घेण्यात आला.
असे आहेत समिती सदस्य
या पंचायत राज समितीचे आ.प्रकाश भारसाकळे, आ. अनिल गोटे, आ. विकास कुंभारे, आ. भीमराव तापकीर, आ. आर. टी.देशमुख, आ. अनिल बाबर,आ. भरतशेठे गोगावले, आ. हेमंत पाटील, आ. राजाभाऊ वाजे, आ. के.सी. पाडवी, आ. बसवराज पाटील,आ. उन्मेश पाटील, आ. समीर कुणावार, आ. राजेंद्र नजरधने, आ. कृष्णा गजबे, आ. रमेश बुंदिले, आ. अमित झनक, आ. राहूल मोरे, आ. सुरेश लाड, आ.दीपक चव्हाण, आ. अनिल तटकरे, आ. रामहरी रुपनर, आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षण सभापती मधुकर गर्दे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित होते.