येरवडा । पुणे-नगर रोड मार्गावरील नगररोड क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत झालेल्या शौचालय घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई होणार का?असा सवाल राष्ट्रीय परिवर्तन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव डावरे यांनी केले असून यासंदर्भात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
शहर, उपनगर व ग्रामीण भाग हागणदारी मुक्त करण्यासाठी देश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी केंद्र, राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी 4 ते 8 हजार तर महापालिकेच्या वतीने 6 हजार रुपये मंजूर करण्यात आली आहेत. दिड वर्षापासून उपनगरात ही योजना राबविण्यात येत आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जवळपास 904 ग्राहकांना कागदोपत्री लाभ मिळाल्याचे दाखविण्यात जरी आले असले तरी पण यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे डावरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ज्या वेळेस या योजनेच्या लाभासाठी नागरिकांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने यासाठी 4 ते 5 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी पालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांनी केली. नागरिकांनी कर्ज काढून ही रक्कम पालिकेकडे दिली. मात्र, त्याबदल्यात त्यांना कोणत्याही प्रकारची पावती देण्यात आली नाही. नागरिकांची फसवणूक करून यामध्ये जवळपास 40 ते 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डावरे यांनी केला आहे.
शौचालयाची कामे अर्धवट
शासनाच्या वतीने प्रत्येक व्यक्तीमागे 18 हजार रुपये मंजूर केले असून सदरची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आज दिड वर्षे उलटूनही ही रक्कम जमा झाली नसल्याने सदर शौचालय प्रकरणात दिड कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या लाभार्थींना शौचालयाचे काम करून दिले आहे. ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. तर काही लाभार्थींना फक्त एक भिंत टाकून देण्याचे काम करून देण्यात आले आहेत. तर काहींच्या शौचालयावर पत्रे देखील टाकण्यात आलेली नाहीत हे दिसून येत आहे. यापूर्वी शौचालये असताना अशा ठिकाणी फक्त रंगरंगोटी करून पालिकेच्या वतीने काम पूर्ण करून दिल्याचा दावा करत आहेत. यामुळे शासनाच्या रकमेसह समाजातील अनेक गोरगरीब जनतेच्या पैशाची लुबाडणूक करून अधिकार्यांनी पैसे लाटल्याचा आरोप करण्यात येत आहे.
…तर उपोषणाला बसणार
पालिका अधिकार्यांना यासंदर्भात वारंवार विचारणा करून देखील अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे शासनाची किती मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. हे उघड होत आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी हे पदाचा गैरवापर करून जनतेसह शासनाचीदेखील फसवणूक करत असल्याचे उघड होत आहे. दोषी अधिकार्यावर कठोर कारवाई व्हावी, याकरीता डावरे यांनी पालिका अधिकारी कुणाल कुमार यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र जगताप, नगररोड क्षेत्रीय कार्यालय, सहाय्यक पालिका आयुक्त वसंत पाटील, पालिका परिमंडळ विभाग क्र. 1 चे अधिकारी विजय दहिभाते यांना ही निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी करणार असून याविरोधात सोमवारी (दि. 13) संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा डावरे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे राकेश वाल्मिकी, सुहास ठोकळ, सिद्धार्थ कांबळे, भीमसेन कांबळे, नंदा यादव, मंगल हरपळे, राजेश गंगावणे आदी उपस्थित होते.