भ्रष्ट लॉबीला केंद्रेकरांच्या बदलीस यश

0

पुणे : सर्वसामान्य शेतकरीवर्गाची प्रशासनात कदर करणारे आणि अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांची अखेर सरकारने बदली केली आहे. त्यामुळे कृषी विभागातील भ्रष्ट लॉबी अखेर जिंकली. कृषी विभागाला शिस्त लावण्याचा धडक कार्यक्रम केंद्रेकर यांनी हाती घेतला होता. त्यामुळे कृषी विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांचे धाबे दणाणले होते. केंद्रेकरांच्याजागी आता यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बैठक सुरु असतानाच धडकला बदलीचा आदेश
गेल्या सात ते आठ दिवसांपासून कृषी आयुक्त केंद्रेकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा राज्यात सुरू होती. अखेर या चर्चेला मंगळवारी शासनाने आदेश काढून विराम दिला. कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांना शेतकरी योजना आणि निधीचा वापर या विषयावर आयुक्तालयात पाचारण केले असताना आणि त्याबाबत बैठक सुरू असतानाच त्यांच्या बदलीचा आदेश धडकला. राज्य सरकारच्या या निर्णयाने कृषी विभागात एकच खळबळ उडाली. श्री. केंद्रेकर यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना तत्काळ जबाबदारी स्विकारण्यासही सांगण्यात आले आहे. केंद्रेकर यांनी कृषी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यापासून कडक धोरण घेतले होते. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले होते. शेतकर्‍यांसाठी काम करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. खते, औषधविक्रीतील चुकीच्या बाबी रोखण्यासाठी पावले उचलली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, कृषी विभागातील भ्रष्टाचार्‍याला मोठ्या प्रमाणात पायबंद घातला होता. त्यामुळे लाभार्थी अधिकारी अस्वस्थ झाले होती.