मंकी हिलजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

0

लोणावळा : मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवरून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर खंडाळा घाटातील मंकी हिलजवळ दरड कोसळली. ही दुर्घटना सोमवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ठाकूरवाडी स्टेशन ते मंकी हिल दरम्यान घडली. पावसामुळे दरड कोसळल्याने काही मोठे-मोठे दगड एक्स्प्रेसच्या ‘एस- 6’ या स्लीपर बोगीचे छत तोडून आत पडले. या घटनेत बोगीतील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ कल्याण येथील रेल्वेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. सुदैवाने या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी दगड रुळावरून बाजूला केले. त्यानंतर तासाभराने हुबळी एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

एक्स्प्रेसला तासभर उशीर
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या लोणावळा आणि कर्जत स्टेशन दरम्यान खंडाळा घाटातील ठाकूरवाडी स्टेशन आणि मंकी हिल दरम्यान किलोमीटर क्रमांक 116/5 या ठिकाणी ही घटना घडली. सकाळी सव्वा पाचच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवरून जाणार्‍या हुबळी एक्स्प्रेसवर काही मोठमोठे दगड येऊन कोसळेल. यातील एक दगड हुबळी एक्सप्रेसच्या ’एस- 6’ या बोगीचे छत तोडून आत पडला. या घटनेमुळे इतर रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. या घटनेत काही मोठे दगड रुळांवर पडल्याने एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. पाऊस सुरू असल्याने प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. रेल्वे कर्मचार्‍यांनी रुळावरील दगड बाजूला केल्यानंतर एका तासाने एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली.

कधीही मोठ्या अपघाताची शक्यता
यंदा पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई लाईनवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. एकूणच या सर्व घटना पाहता या मार्गावर कधीही मोठा अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. केवळ सुदैवाने खंडाळा घाटात फार मोठा अपघात झालेला नाही. मोठा अपघात होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने डोंगराळ भागातील धोकादायक दरडी काढाव्यात, अशी मागणी होत आहे. लोणावळा ते कर्जत दरम्यान खंडाळा घाटातील रेल्वे मार्गावर खास नजर ठेवणे रेल्वे विभागासाठी आवश्यक झाले आहे. यापूर्वीही छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत.

महिनाभरात तिसरी घटना
पुणे-मुंबई रेल्वे मार्गामध्ये दरड कोसळण्याची ही मागील एका महिन्यातील तिसरी घटना आहे. एकदा रेल्वे रूळ खचल्याची घटनादेखील नुकतीच घडली आहे. 18 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले होते. डोंगरावरून रेल्वे लाईनवर आलेल्या दगडांमुळे ही घटना घडली होती. या दुर्घटनेमुळे चार तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच, 19 जुलै रोजी पुण्याकडून मुंबईकडे येणार्‍या सिंहगड एक्स्प्रेससमोर काही मोठे दगड आल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या.

आठ महिन्यात पाच घटना
याच पावसाळ्यात 22 जुलै रोजी मंकी हिलजवळ रेल्वे रुळ खचल्याने मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्स्प्रेस काही काळ खोळंबली होती. यापूर्वी, याच वर्षी 30 जानेवारी रोजी घडलेल्या पाचव्या घटनेत खंडाळा घाटातील एका बोगद्याच्या तोंडावरच दरड कोसळून रेल्वे रुळावर दगड आल्याने त्या ठिकाणी काम करणार्‍या एका रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. तर तीन कर्मचारी जखमी झाले होते. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत पाच मोठ्या घटना घडल्या आहेत.