तिघांविरुद्ध गुन्हा ; एका आरोपीस अटक
पारोळा- तालुक्यातील मंगरूळ येथे तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंध व पळवून नेल्याच्या संशयातून 38 वर्षीय इसमास बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कैलास श्रीकृष्ण पाटील (38) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी भाऊसाहेब उर्फ युवराज माधवराव पाटील यास ताब्यात घेतले असून गुन्ह्यातील लाकडी दांडकाही जप्त केला आहे.
संशयातून खून ; तिघांविरुद्ध गुन्हा
मयताचे वडील कृष्णा सोनू पाटील (रा.मंगरूळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून आरोपी आरोपी भाऊसाहेब उर्फ युवराज माधवराव पाटील, सूर्यभान उर्फ पिंटू माधवराव पाटील, समाधान उर्फ गणेश युवराज पाटील (सर्व रा.मंगरूळ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत कैलास पाटील याचे आरोपीच्या मुलीची प्रेमसंबंध असल्याच्या तसेच तिला पळवून नेल्याच्या संशयातून बुधवारी सकाळी आरोपींनी वाद घातला. युवराज पाटील याने लाकडी दांड्याने डोक्यावर, पाठिवर मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच अन्य दोघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी पोटात, तोंडावर मारहाण केल्याने कैलासचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजितसिंग देवरे करीत आहेत. दरम्यान, खुनानंतर चाळीसगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक रफिक शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.