मंगलुर सेंट्रल येथील 45 रेल्वे प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्रात आणावे

0

भुसावळ : महाराष्ट्रातील 45 रेल्वे प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेटींस धारक) मंगलुर सेंट्रल (कर्नाटक राज्य) मागील दीड महिन्यांपासून अडकलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्याच्या सीमा बंद असल्याने भुसावळ येथील श्रीनगर भागातील निवृत्ती समाधान साबळ, रेवानंद अनिल भोळे, गौरव चंद्रकांत कोळेकर, राहुल विलास सरोदे व अडकलेल्या मुलांनी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्याशी संपर्क साधला. प्रशिक्षणार्थीनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव, नाशिक, नागपूर, नांदेड, अकोला, अमरावती, गोंदिया भागातील प्रशिक्षणार्थी अडकलेले आहे. येथील खानावळ बंद झाल्याने प्रशिक्षणार्थीना जेवणासाठी 7 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. आर्थिक कोंडी झाल्याने येथे अडकलेल्या प्रशिक्षणार्थीचे पालकही त्यांना पैसे पाठवू शकत नाही. त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे अशा प्रशिक्षणार्थीना राज्यात परत आणण्याची राज्य शासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी भुसावळ शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पाठपुराव्याची गरज
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतर राज्य सरकारने नांदेड येथे अडकलेल्या यात्रेकरूंना परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. नांदेड येथील हुजूर साहिब गुरुव्दारामध्ये अडकलेल्या यात्रेकरुंना बसमधून दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये परत पाठवण्यात आले. आता कोटा येथील विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यात आणण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे म्हणून यांची सुद्धा घरी परत येण्याची आशा पल्लवित झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील या मुलांना स्वराज्यात आणण्यासाठी व्यवस्था करावी किंवा पालकांना परवानगी द्यावी, अशी मागणी प्रा.पाटील यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.