पुणे । लोहगाव देहु गटातून जिल्हापरिषदेवर निवडून आलेल्या मंगल जंगम यांचे जातप्रमाणपत्र जातपडताळणी समीतीने रद्द केले आहे. त्यांचा बेडा जंगम जातीचा दाखला नसून जंगम जातीचा असल्याचा निर्णय समीतीने दिला.
जि. प. निवडणुकीसाठी जंगम यांनी अनुसूचीत जाती प्रवर्गातून राखीव गटातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी बेडा जातीचा दाखला जोडला होता. त्यांचा दाखला जातपडताळणी समीतीपुढे गेल्यानंतर राजू खंडागळे यांच्यासह तीन जणांनी त्यावर हरकत घेतली होती. याप्रकरणी जातपडताळणी समीतीपुढे झालेल्या सुनावणीत जंगम यांना बेड जातीचे असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करता आले नाही. जात पडताळणी समितीने जंगम लिंगायत जंगम असल्याचे निरिक्षण नोंदविले. जंगम जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ठ आहे. बेडा जातीचा व्यवसाय अस्पष्ट समजल्या जाणार्या चर्मकार व्यवसायाशी निगडीत आहे. दक्षता पथकाच्या चौकशीत जंगम यांचा व्यवसाय भिक्षुकी, पुजाकरणी यासंबंधीत असल्याने ते जंगम जातीचे असल्याचे नमूद केले. बेडा जंगम असल्याचा पुरावा जंगम यांना देता न आल्याने समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. त्यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णया विरोधात जंगम उच्च न्यायालयात अपिल करू शकतात.