मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे वृक्षदिंडीचे आयोजन

0

अमळनेर। येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शहरात भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच संस्थेच्या यू ट्यूब चॅनेलचे लोकार्पणही याच कार्यक्रमात होणार आहे. मंगळग्रह देवता ही भूमिपूत्र मानली जाते. त्यामुळे भू मातेच्या संरक्षण व संवर्धनासाठी मंगळग्रह सेवा संस्था वृक्षदिंडीचे आयोजन करीत असते. गुरूवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता वृक्षदिंडीला सानेगुरूजी विद्यामंदिर (धुळेरोड) येथून प्रारंभ होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी असतील. दिंडीचा प्रारंभ आमदार स्मिताताई वाघ यांच्याहस्ते होणार आहे. वृक्षदिंडीची संकल्पना पर्यावरण बचाव लोकचळवळ भव्य रॅली अशी आहे. यात शोभारथ, लेझीम पथक, वाद्य वृंद असतील. कलश किंवा रोपे असलेल्या कुंड्या घेवून महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकानी केले आहे.

कार्यक्रमात मंगळग्रह यू ट्यूब चॅनेलचे लोकार्पण जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते होईल. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पं.स. सभापती वजाबाई भील, माजी आमदार साहेबराव पाटील, कृउबा सभापती उदय वाघ, जिल्हा बँक संचालक अनिल पाटील, हिरा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र चौधरी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव आणि प्रांताधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती राहणार आहे. सुमारे पाच हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमींचा या रॅलीत समावेश असेल. रॅली साने गुरुजी शाळेतून स्टेशन रोड, सुभाष चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार मार्गे वाडी चौकात आल्यावर सांगता होईल.

मंगळग्रह मंदिर पर्यटनस्थळ विकास
मंगळग्रह मंदिराचा परिसर हा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. .पर्यटन विकास महामंडळही योगदान देत आहे. मंगळग्रह सेवा संस्था परिसरात विविध विकास कामे व सतत समाजाभिमुख नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. या अंतर्गत परिसर स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी मेळावे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,पर्यावरण संवर्धन असे उपक्रम घेतले जातात. श्री मंगळदेव ग्रह मंदिर व परिसरातील उपक्रमांची माहिती भाविक व पर्यटकांना व्हावी म्हणून मंगळग्रह सेवा संस्था यू ट्यूब चॅनेल सुरू करीत आहे.