नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल प्रकरण
पोलिस निरीक्षक हंकारे यांच्या चौकशीची मागणी
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अनिकेत वाघ यांच्याविरोधात इंदापूर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी मंगळवारी बंद पुकारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वाघ यांच्या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी छापा मारू गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. या दोन महिलांकडून हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता, अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली होती.
गुन्हा दाखल करणे हे षडयंत्र!
याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. नगरसेवकावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र असून, यासाठी पोलिस अधिकार्यांना हाताशी धरण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी वाघ यांच्या समर्थकांनी केली आहे. अनिकेत वाघ यांच्या विरोधातील गुन्ह्यातील बनावट ग्राहक हे शेवाळे हा इंदापूरचे पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. या प्रकरणातील वेश्या व्यवसाय करणार्या महिलादेखील बनावट आहेत. याप्रकरणी पीआय सजन हंकारे व बनावट ग्राहक शेवाळे यांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले काय ते स्पष्ट होईल, असे वाघ यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. काँग्रेसने महिनाभरापूर्वी हंकारे यांना निलंबित करावे म्हणून रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला.