देहूरोड । रावेत येथे समीर लॉन्सजवळ कात्रज बाह्यवळण मार्गावरील पुलाखाली थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील दहा तोळे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसका मारून पळवून नेले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा नखाते (वय 40, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
नखाते या येथे एका समारंभासाठी आल्या होत्या. कात्रज बाह्यवळण मार्गावरील पुलाखाली त्यांची मोटार लावलेली होती. कार्यक्रम आटोपून रात्री 8.30 च्या सुमारास त्या मोटारीजवळ आल्या. येथे थांबलेल्या असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. देहूरोड पोलिसांनी दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद घोळवे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.