मंगळ ग्रह मंदिराची टपाल खात्याकडून दखल

0

मंगळवारी विशेष आवरण पाकीट समारंभपूर्वक होणार जारी

अमळनेर – येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराची आता टपाल खात्यानेही ऐतिहासिक दखल घेतली आहे. येत्या मंगळवारी समारंभपूर्वक मंदिराचे छायाचित्र असलेले विशेष आवरण (पाकीट) जारी होणार आहे.
श्री मंगळदेव ग्रह मंदिराच्या निमित्ताने अशा प्रकारचे पाकीट खान्देशात प्रथमच जारी होत आहे . हे मंदिर प्रथम मानकरी ठरले आहे . श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे ज्वाज्वल्य , तेथील स्वच्छता, भाविकांना मिळणार्‍या सोयी-सुविधा ,पारदर्शकता , सामाजिक जाणिवेचे उचीत भान यामुळे या मंदिराची ख्याती देशातील कानाकोपर्‍या पर्यंतच नव्हे तर परदेशातही सोशल मिडियामूळे पोहोचली आहे. राज्यातील बोटावर मोजण्याइतकीच मंदिरे ’ आयएसओ ’ मानांकित आहेत. त्या श्रेयनामावलीत या मंदिराचा समावेश आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेवर या देवस्थानाचा सुपरिणाम आता दृश्य स्वरूपात स्पष्ट पणे दिसू लागला आहे . या सर्व बाबींचा एकूणच परिपाक म्हणून पोस्ट खात्याने या मंदिराची खूप मोठी दखल घेतली आहे.पाकिटावर श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे छायाचित्र आहे.


मंगळवारी विमोचन
मंगळवारी दि. २६ रोजी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्टर जनरल व्ही. एस. जयशंकर यांच्या हस्ते मंदिरात पाकिटाच्या विमोचनाचा कार्यक्रम होईल. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले प्रमुख अतिथी असतील .
या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेने केले आहे .