मंजुरी मिळूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निविदेस मुहूर्त सापडेना
सरपंच, उपसरपंचासह सदस्य आमरण उपोषणास बसणार
पाचोरा। तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी 27 मार्च 2020 रोजी शासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर 14 ऑगस्ट 2020 रोजी तांत्रिक मान्यताही मिळाली होती. मात्र, लोहारा हे गाव पाचोरा तालुक्यात असले तरी ते जामनेर मतदारसंघात येते. जिल्हा परिषदेतही भाजपचीच सत्ता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी मिळविणारे जिल्हा परिषद सदस्य व लोहारा येथील ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असल्याने केवळ राजकीय द्वेषापोटी इमारतीच्या बांधकामास तांत्रिक मान्यता मिळूनही 11 महिने उलटले आहे. तरीही निविदा धारकास कार्यआरंभ आदेश मिळत नसल्याने 1 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, उपसरपंच विमलबाई हिरालाल जाधव व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणास बसणार आहे. अशा आशयाचे निवेदन सरपंच व उपसरपंच यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आ. किशोर पाटील, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच दिले आहे.
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुन्या व पडक्या स्वरूपाची झाली आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील लोहारा, कळमसरा, शहापुरा, कासमपुरा, म्हसास, म्हसास तांडा, रामेश्वर तांडा, लाख तांडा, कुर्हाड बु, कुर्हाड खु, कुर्हाड तांडा या परिसरातील असंख्य नागरिक उपचारासाठी येतात. यावर्षी अतिवृष्टी झाल्याने इमारतीची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. ती केव्हा कोसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवून तीन कोटी 55 लाख रुपयांची 27 मार्च 2020 ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर अंदाज पत्रकास 14 ऑगस्ट 2020 ला तांत्रिक मान्यता देऊन 20 नोव्हेंबर 2020 ला निविदा प्रसिद्ध करून निविदा 29 जानेवारी 2021 रोजी उघडण्यात आली होती.
इमारतीच्या बांधकामासाठी आदेश द्या
निविदेच्या सर्व शर्ती, अटी पूर्ण करून मक्तेदार सुनील पाटील यांनी सर्वात कमी किंमत भरल्याने ती मंजूर करून त्यांना मिळायला हवे होते. मात्र, तसे न होता श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर, जळगाव यांनी निविदा परिपूर्ण नसल्याचे दाखवित फेटाळून लावली होती. याबाबत श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर जळगाव यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून न्याय मागितला होता. परंतु न्यायालयाने त्यांच्या रिट याचिकेतील मागणी केलेल्या विनंतीस कुठलेही आदेश पारित केलेले नाही. मुद्दाम जिल्हा परिषद प्रशासनाकडून अडचण निर्माण करण्यात येत आहे. इमारतीच्या बांधकामासाठी कार्य आरंभ आदेश 1 डिसेंबरच्या आत न दिल्यास जळगाव येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर 1 डिसेंबरला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहे.
जि.प. सदस्यही देणार उपोषणास पाठिंबा
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शिवसेनेचे लोहारा, कुर्हाड गटातील जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांनी पाठपुरावा केला होता. या इमारतीमुळे परिसरातील अनेक नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे. मात्र, केवळ राजकीय द्वेषापोटी आरंभ आदेश मिळत नसल्याचे दीपकसिंग राजपूत यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले. लोहारा येथील पदाधिकार्यांसोबतच दीपकसिंग राजपूत हे स्वतः व शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील हेही उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.