जळगाव। मंजुर शासकीय निधीचे 4 टक्क्याप्रमाणे तक्रारदार यांचा खर्च वजा जाता मोबदल्याची मागणी सहाय्यक वनसंरक्षक सुर्यकांत चावदस नाले (वय 57) यांनी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग धुळे येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज शुक्रवारी पथकाने कारवाई करुन नाले यांना मोबदला स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तर याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वनपरिक्षेत्र अधिकार्याच्या तक्रारीनंतर कारवाई : तक्रारदार हे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी माहे डिसेंबर 2016 ते मार्च 2017 पावेतो त्यांच्या वनपरिक्षेत्रात विविध शासकीय कामे केलेली असून तक्रारदार यांचे वरिष्ठ अधिकारी सुर्यकांत नाले यावल वनविभाग यांनी सदर शासकीय कामे त्यांच्या सहीने वरिष्ठांकडे पाठविली होती. त्यांच्या सहीमुळेच कामे मंजूर होवून शासनाकडून 50 ते 55 लाख रुपयांचा निधी तक्रारदार यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्याने तक्रारदार यांनी सदरची कामे केली आहेत, असे लोकसेवक नाले यांनी तक्रारदार यांना सांगून मंजूर शासकीय निधीचे 4 टक्के प्रमाणे खर्च वजा करता 1 लाख 82 हजार रुपये मोबदल्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग धुळे येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन मोबदल्याची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव कार्यालयात सापळा रचला होता. लोकसेवक सुर्यकांत नाले यांनी तक्रारदाराकडून पंच साक्षीदार यांच्यासमक्ष 1 लाख 82 हजार रुपये मोबदला म्हणून स्वीकारल्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
रामानंद ठाण्यात गुन्हा
पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, तसेच लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुनिल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. पवन देसले, पथकातील जितेंद्र परदेशी, कैलास जोहरे, देवेंद्र वेंदे, कृष्णकांत वाडिले, कैलास शिरसाठ, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, संदीप कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली. यासंदर्भात रामानंद पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.