मंजुळा हत्याप्रकरणी तुरुंग अधीक्षकाला क्लीन चिट

0

मुंबई । भायखळा तुरुंगात झालेल्या अमानुष मारहाणीनंतर मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. ज्या प्रकरणात तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांना निलंबित करण्यात आले होते. भायखळा तुरुंगात मंजुळा शेट्येला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मागील वर्षी जून महिन्यात ही घटना घडली होती. ज्यानंतर चंद्रमणी इंदुलकर यांचे निलंबन करण्यात आले. मात्र, कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिली. भायखळा येथील ऑर्थर रोड तुरुंगात कैद्यांना देण्यात येणारी अंडी आणि पाव यांचा हिशेब लागत नसल्याचे कारण पुढे करून ऑर्थर रोड तुरुंगात मंजुळा शेट्येला मारहाण करण्यात आली होती. वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिला पोलिसांसह एकूण सहा पोलिसांना अटक करण्यात आली होती.

मंजुळा शेट्येला झालेल्या मारहाणीनंतर तुरुंगातील महिला कैद्यांनी तुरुंगाच्या गच्चीवर जाऊन आंदोलन केले होते. शीना बोरा हत्याकांडात अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने मंजुळा प्रकरणात पोलिसांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. आता याप्रकरणी तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांना क्लीन चिट देण्यात आली. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनीही आवाज उठवला होता. तुरुंग अधीक्षक ही एवढी मोठी घटना घडत असताना शांत का बसले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान चंद्रमणी इंदुलकर हे 22 आणि 23 जूनला पुण्यात असलेल्या एका सेमिनारसाठी गेले होते. त्यामुळे या दोन दिवसांत जे घडले त्याची कल्पना त्यांना नव्हती असे सांगण्यात आले. तुरुंग अधीक्षकाने या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घ्यायला हवी होती, असे सांगत त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता त्यांना क्लीन चिट देण्यात आली.

कोण होती मंजुळा?
मंजुळाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. आई, भाऊ, वहिनी आणि दोन मुले असे त्यांचे लहान कुटुंब भांडुपच्या एका छोट्या चाळीत राहत होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, किरकोळ कारणांवरून भाऊ आणि वहिनीत वारंवार खटके उडत होते. 2004 मध्ये नवर्‍याच्या जाचाला कंटाळून मंजुळाच्या वहिनीने स्वतःला पेटवून घेतले. त्या दुर्घटनेत ती थोडक्यात बचावली. नवर्‍याच्या जाचाला कंटाळूनच हा प्रकार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, भावाने वहिनीला जबानी बदलण्यास सांगत, मंजुळा आणि आईच्या जाचाला कंटाळून हे कृत्य केल्याचे न्यायालयात सांगण्यासाठी धमकावले. तसे न केल्यास मुलांची हत्या करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. त्यामुळे मंजुळाच्या वहिनीने मंजुळा आणि सासूविरोधात साक्ष दिली.