मंडप उभारताना दिव्यांच्या खांबाचा आधार घेऊ नका

0

पुणे । सुरक्षितता बाळगून कशाप्रकारे मंडप उभारणी करावी, यासाठी महापालिकेने गणेशमंडळांना सूचना केल्या आहेत. मांडव उभारताना रस्त्यावरील दिव्यांच्या खांबांचा आधार घेऊ नये, पोल मांडवामध्ये येणार नाहीत अशाप्रकारे मांडव उभारावा, रस्त्यांवरील दिव्यांचा खांब आणि मांडव यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन पालिकेच्या विद्युत विभागाने मंडळांना केले आहे.

परवानाधारक वायरमनची नेमणूक करा
मांडव उभारताना रस्त्यावरील दिव्यांची खांबाच्या वायरना अडथळा येणार नाही किंवा वायर मांडवात येणार नाही याची दक्षता घ्यावी. रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावरील जंक्शन बॉक्समधून विद्युत पुरवठा घेण्यात येऊ नये. विद्युत रोषणाईसाठी स्वतंत्र वीज मीटर घेण्यात यावा, महापालिकेच्या वीज मीटरमधून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेऊ नये. मांडवांमध्ये करण्याच्या विद्युत विषयक कामासाठी परवानाधारक वायरमनची नेमणूक करावी, असे आदेश पालिकेने दिले आहेत. मांडवामध्ये केलेल्या विद्युत रोषणाईसाठी महापालिकेचे रस्त्यावरील दिवे बंद करण्याची गरज भासल्यास परस्पर ते दिवे बंद न करता, संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.