मंडयांतील गाळ्यांचे वर्षाला 10% भाडेवाढ

0

मुंबई । मुंबईतील पालिका मंडयांमधील गाळ्यांचा खर्च पालिकेला डोईजड झाला असून होणारी तूट भरून काढण्यासाठी वर्षाला दहा टक्क्यांनी भाडे वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या पालिकेच्या मंड्यांमधील वार्षिक तूट 24 कोटी 34 लाखांवर गेली. त्यामुळे हि दरवाढ करण्याचा निर्णय प्रशासनणे घेतला आहे . याचा फटका मच्छीविक्रेते आणि ठोक भाडे देणार्‍या गाळेधारकांना बसणार असून त्यांचे भाडे दुपटीने वाढवण्यात येणार आहे. यापुढे प्रत्येक वर्षी 10 टक्क्यांनी गाळ्यांची दरवाढ केली जाणार आहे.

मुंबईत पालिकेच्या शंभरावर मंडया आहेत. या मंडयांमधील गाळ्यांच्या भाड्यामध्ये 1996 पासून भाडेवाढ झालेली नाही. गेल्या 21 वर्षांत भाडेवाढ झाली नसताना मंडयांचे परिरक्षण आणि व्यवस्थापनासाठी होणार्‍या खर्चात मात्र मोठी वाढ झाली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात मंडयांमध्ये दर्जेदार सुविधा देण्यासाठी भाडेवाढ प्रस्तावित केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये मंडयांमधील गाळ्यांचे ‘अ , ब व क श्रेणीनुसार ‘नॉन मार्केटबल व मार्केटबल असे वर्गीकरण करून प्रति चौरस फूट भाडेवाढे केली जाणार असल्याचे भाडेवाढीच्या प्रस्तावात म्हटले आहे.