मंडळांनी ‘जलयुक्त’ अभियानात सहभागी व्हावे

0

नंदुरबार। विविध गणेश मंडळांनी राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता अभियान, कुपोषण मुक्ती या सामाजिक विषयांवर काम करत असतांनाच जलयुक्त शिवार अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केले. ते लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान 2016 च्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, रोटरी क्लबचे अनिल अग्रवाल, सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागीय कार्यालय औरंगाबादचे मेघा लोेंढे, जिल्हा समन्वयक नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.

मंडळाचा रोख रक्कम देऊन सत्कार
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक एकता गणेश मंडळ, खैरवे, ता.शहादा, जि.नंदुरबार या मंडळाने मिळविला असून त्यांना 1 लाखाचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक कुणबी राजा गणेश मंडळ, नंदुरबार या गणेश मंडळास मिळाला. त्यांना 75 हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तर तृतीय क्रमांक आप्पा गणेश मंडळ, तळोदा, जि.नंदुरबार या मंडळाने मिळविला असून त्यांना 50 हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. विविध तालुकास्तरीय बक्षिसांना प्रथम 25 हजार, द्वितीय 15 हजार तर तृतीय क्रमांकास 10 हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. या बक्षिस वितरणादरम्यान जलयुक्त शिवार अभियानासाठी उत्कृष्ठ कार्य करणार्या विनोदकुमार ढोढरे यांचा जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.