मंडळांमुळे गणेशोत्सव यशस्वी मंडळांमुळे गणेशोत्सव यशस्वी 

0

पुणे । सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये सतत संवाद होत असतील तर नागरिकांचे प्रश्न समजण्यास मदत होते. गणेशोत्सवादरम्यान मंडळांना भेट देताना त्यांचे प्रश्न समजले. पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांना सहकार्य केल्यामुळे गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्याचबरोबर पुणेकरांनी देखील चांगल्या पध्दतीने सहकार्य केले, असे मत पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत तत्परतेने काम करणार्‍या अग्नीशमन दलातील कर्मचारी, जीवनरक्षक आणि स्वच्छता कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, शैलेश टिळक, मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, नितीन पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाचे कर्मचारी व जीवनरक्षक यांचे औक्षण केले. विसर्जन मिरवणूक पाह ण्यासाठी देशभरातून अनेक नागरिक शहरात येतात. यावेळी अत्यंत तणावाचे वातावरण असते. पोलिस कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी असे अनेक लोक यावेळी तत्परतेने आपले कर्तव्य बजावित उत्सव शांततेने पार पडावा यासाठी प्रयत्नशील असतात. अशा कर्मचार्‍यांचा सन्मान हा मोलाचा आहे, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

महापौरांचा विशेष सत्कार  गणेशोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात पालिकेचा सहभाग मोठा होता. या सहभागानिमित्त महापौर मुक्ता टिळक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांच्यावतीने शैलेश टिळक यांनी सन्मान स्विकारला. विनायक कदम, विकास पवार, प्रदिप इंगळे, वैशाली खटावकर, विशाखा पवार, स्वप्नाली पंडीत, प्रतिभा रामलिंग, सुरेखा दिवेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विवेक खटावकर यांनी प्रास्ताविक केले. नितीन पंडीत यांनी सूत्रसंचालन केले.