मंत्रालयातील आत्महत्यांमागे विरोधक!

0

सरकारला आला संशय : गृहखात्याला कामाला लावले!

मुंबई : मंत्रालयात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या त्रस्त व्यक्तींच्या आत्महत्या प्रकरणांमागे नेमका कोणाचा हात आहे काय? हे शोधण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार असून, या संशयाची सुई विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यास राज्याच्या गृहविभागाने सुरूवात केली आहे. सरकारची प्रतिमा हेतुपुरस्सर मलीन करण्यासाठी आणि सरकारपुढील अडचणी वाढवण्याच्या प्रयत्नात काहीजण असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यासाठी आतापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, काही फोननंबरचे सीडीआर चेक करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. पंधरा दिवसांत आत्महत्या व आत्महत्येच्या प्रयत्नांच्या चार ते पाच घटना घडल्यामुळे मंत्रालयाची सुरक्षायंत्रणा पुरती हादरून गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे.

धर्मा पाटील ते हर्षल रावते प्रकरणाने संशय बळावला
22 जानेवारीला धर्मा पाटील या धुळ्यातील ज्येष्ठ शेतकर्‍याने आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करणार्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचे नाव हर्षल रावते. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. न्यायालयाच्या आदेशानंतरही पेन्शन मिळत नाही, म्हणून शुक्रवारी गंगाधर पाटील या निवृत्त शिक्षकाने शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या दालनानासमोर ठिय्या आंदोलन केले. सरकारने न्याय दिला नाही तर आपण जिवाचे बरेवाईट करून घेऊ अशी धमकी या शिक्षकाने दिली. हे शिक्षक बीड जिल्ह्यातील लिंबागणेशच्या महाविद्यालयातून 2015 मध्ये निवृत्त झाले आहे. ही प्रकरणे नेमकी कोण मंत्रालयापर्यंत घेवून येत आहे. त्यांना कोणी मंत्रालयापर्यंत घेवून येत आहे का? त्यात काही समान धाका सापडतो का? घटना घडली की विरोधी पक्षाचे नेते लगेच कसे पोहोचतात, या सर्व बाबी तपासल्या जात आहेत.

मंत्रालयाच्या गच्चींना जाळी लागणार
मंत्रालयातील आत्महत्या प्रकरणांना थोपवण्यासाठी मंत्रालयाच्या गच्चींना आता जाळी बसवण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी दैनंदिन 150 पोलिस तैनात असतात. मात्र मंत्रालयात दररोज येत असलेल्या अभ्यांगतांची मोठी संख्या पाहता ही संख्या अपुरी पडते आहे. आत्महत्या होऊ नयेत यासाठी आता प्रत्येक मजल्यावर काही पोलिसांना तैनात करण्यात आल्याने मंत्रालयाची सुरक्षा सांभाळणार्‍या पोलिसांवर अधिक ताण पडणार आहे. मंत्रालयाच्या गच्चींना जाळी लावण्याची सूचना मंत्रालयाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी केली होती. तसेच 150 सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. मंत्रालयात आत्महत्याच्या वाढत्या घटनांमुळे सरकार उपाययोजनासाठी खासगी सुरक्षा एजन्सीची मदत घेण्याची शक्यता आहे. तसेच अभ्यागतांना द्यावयाच्या प्रवेश पाससंदर्भात नवी पद्धती आणण्याचा सरकारचा विचार आहे.

शरद पवारांची सूचना धाब्यावर बसविली!
मंत्रालयाच्या नव्या इमारतीच्या लॉबीला ग्रील बसविलेले नाहीत. त्यामुळे ते धोकादायक आहे. तोल जाऊन कोणीही पडू शकते, अशा तक्रारी गेल्या चार वर्षापासून सरकारी अधिकारी व कर्मचारी करत आहेत. मंत्रालयाला आग लागल्यानंतर ही इमारत पाडून पूर्णपणे नवी इमारत बांधण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन आघाडी सरकारला केली होती. मात्र तत्कालीन मुख्य सचिव बांठिया यांच्या समितीने सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून आलेल्या सूचनांना केराची टोपली दाखविली होती. मंत्रालयाच्या लॉबीला ग्रील लावलेले नाही. मंत्रालयाचे केलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे, याबाबत मंत्रालयात अधिकारी व कर्मचारी बोलत आहेत.