मंत्रालयातील बडतर्फ क्लार्कला पुण्यात अटक

0

पुणे : लाच प्रकरणात मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आलेल्या लिपीकाला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याने पुणे भूमी अभिलेख कार्यालयातील सहा अधिकार्‍यांची बदली करण्याचे आदेश असणारे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव तसेच स्वाक्षरी असणारे बनावट टेलरहेड देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह मंत्रालयात खळबळ उडाली असून, पोलीस आवाक झाले आहेत. दरम्यान बदल्यांमध्ये मोठा गोलमाल असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यानुसार, पोलीस तपास करत आहेत. सहा जणांच्या बदल्या करण्यासाठी त्याने पाच लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे.

अविनाश हरिचंद्र जाधव उर्फ दिलीप हरिचंद्र शिर्के (47, रा. अनंत अपार्टमेंट, पेंडसेनगर, डोंबवली इस्ट, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या बडतर्फ लिपीकाचे नाव आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाम दत्तात्रय खामकर (55, रा. क्वीन्स गार्डन, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी शाम खामकर हे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयात उप संचालक म्हणून नोकरीस आहेत. त्यामुळे ते संबंधित विभागाच्या आस्थापनेचे काम पाहतात. बुधवारी (12 एप्रिल रोजी) आरोपी अविनाश जाधव उर्फ दिलीप शिर्के आणि एक व्यक्ती जमाबंदी आयुक्त कार्यालयात आले. त्यांनी आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायकांकडे एक पत्र दिले. त्यामध्ये पाच अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश होते. मात्र, स्वीय सहायकाने हे पत्र न घेता आयुक्तांना देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी आम्ही घाईत आहोत त्यामुळे आपण घ्यावे, अशी परत विनंती केली. त्यामुळे स्वीय सहायकाने हे पत्र घेतले. तसेच, आयुक्तांनी याबाबत पत्र देऊन माहिती दिली.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी (गुरुवार दि. 13 एप्रिल) जमाबंदी कार्यालयाच्या फोनवर फोन आला. आपण मुख्यमंत्री महोदयांच्या निवास स्थानातून पी. ए. बोलत असून, साहेबांना फोन द्या असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने बुधवारी दिलेले पत्र त्यामधील बदल्यांबाबात बोलणे केले. मात्र, आयुक्त तसेच स्वीय सहायकासंबंधित फोन हा बदलीचे लेटर हेड घेऊन आलेल्या व्यक्तीचा असल्याचे समजले. त्यानुसार, त्यांनी संबंधित आदेशाची तपासणी केली. त्यावेळी ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली.

त्यानुसार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील आणि सहायक निरीक्षक सुनिल गवळी यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी अविनाश हरिचंद्र जाधव उर्फ दिलीप हरिचंद्र शिर्के याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

कोण आहे जाधव-शिर्के
आरोपी अविनाश जाधव उर्फ दिलीप शिर्के हा मंत्रालयात शिक्षण विभागात नोकरीस होता. 1997 साली तो तेथे नोकरीस लागला होता. 2007 मध्ये जाधव-शिर्के व त्याच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने लाच प्रकरणात रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याला मंत्रालयातून बडतर्फ करण्यात आले. याप्रकरणात शिर्के याला 2011 मध्ये तीन महिन्यांची शिक्षा झाली. दरम्यान त्यानंतर शिर्के हा इजेंट म्हणून कामे करु लागला. तो शासकिय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या, तसेच जमीनींचे व्यावहार तसेच मंत्रालयातील कामे करुन देण्याच्या बहाण्याने पैसे उकळत होता.

बदल्यांसाठी पाच लाख घेतले
आरोपी अविनाश जाधव उर्फ शिर्के याने सहा बदल्या करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यातील तीन लाख रुपये मंत्रालयातील एका महत्वाच्या डेस्कला दिल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, पोलीस तपास करत असून संबंधित व्यक्तीलाही अटक होण्याची दाट शक्यता आहे.