मुंबई (नीलेश झालटे) । दोन दिवसांपूर्वी एका तरुण शेतकर्याने मंत्रालयात 6 व्या मजल्यावरून आत्महत्येच्या प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र या घटनेनंतरही सहाव्या आणि सातव्या मजल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. नव्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेली भिंत अत्यंत कमी उंचीची असल्याने आणि ग्रील नसल्याने हा मजला अत्यंत धोकेदायक बनलेला आहे. या मजल्यावर संरक्षक ग्रील बसविणे आवश्यक असल्याचे सातव्या व सहाव्या मजल्यावरील अधिकारी तसेच कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत एवढी मोठी खळबळ घडूनही उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान साळवे प्रकरणानंतर मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी अभ्यागतांना व क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आलेल्या प्रवेशपासच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. मंत्रालय जे.जे. गेट व नवीन पोस्ट गेट या ठिकाणी व्हीपीएमसी प्रणाली सुरु करण्यात आली असून या प्रणालीनुसार मंत्रालयात येणार्या अभ्यागतांचे व क्षेत्रिय स्तरावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे ओळखपत्र पाहून त्यांना फोटोपास दिला जातो. तद्नंतर सुरक्षा तपासणी करुन त्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. अभ्यागतांनी व क्षेत्रिय स्तरावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचा फोटोपास तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्ष इमारतीची व्यवस्थाच सुरक्षेला भेद करणारी असल्यामुळे बाह्यस्वरूपात कितीही सुरक्षा व्यवस्था केली तरी ती अपुरीच आहे.
मंत्रालयात रोज शेकडोंच्या संख्येने लोक येतात. नव्या इमारतीत प्रवेश केल्यानंतर आकर्षक त्रिमूर्ती प्रांगण आणि सेल्फी प्वाइंट अभ्यागतांचे लक्ष वेधून घेतात. टापटीप असलेली ही इमारत संपूर्ण वातानुकूलित आहे. मात्र सातव्या मजल्यावर गेल्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे लक्षात येते. ह्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर कुठल्याही प्रकारचे ग्रील लावलेले नाहीत. नवीन आलेले नागरिक आकर्षक दिसत असल्याने खाली वाकून बघतात तसेच येथे सेल्फी काढण्याचा देखील प्रयत्न करतात. या मजल्यावर परिषद सभागृह तसेच मंत्री कार्यालय आणि वैद्यकीय सहायता कक्षाचे कार्यालय आहे. या कार्यालयात देखील लोक येत असतात. नागरिकांच्या समस्या अधिकारी ऐकून घेतात मात्र अनेकदा तांत्रिक कारणाने त्यांची कामे होत नाहीत त्यामुळे ज्ञानेश्वर साळवे या
तरुणासारखे कृत्य यापुढेही घडू शकतात.
सुरक्षारक्षकांचा अभाव
या घटनेपासून सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील अधिकारी देखील खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी या ठिकाणी ग्रील बसविण्याबाबत आपल्या वरिष्ठांकडे मागणी केली असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली. अनेकदा विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी या मजल्यावर खूप गर्दी असते. यावेळी इथे सुरक्षा रक्षक देखील नसतात. यामुळे हा मजला कुठल्याही क्षणी जीवघेणा ठरू शकतो.
सातव्या मजल्याला ग्रील लावण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. मात्र हे काम तांत्रिक असल्याने याची टेंडर प्रक्रिया वगैरे होऊन नंतर याबाबत कार्यवाही होईल.
– दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री