मंत्रालयात आत्महत्या टाळण्यासाठी बनवले नायलॉनच्या जाळ्यांचे कवच

0

मुंबई । सरकारदरबारी अडचणी घेऊन येणार्‍या एका तरुणाने नैराश्यातून मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची मंत्रालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांत मंत्रालय परिसरात तीन वेळा आत्महत्येचे प्रयत्न झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या इमारतीच्या लॉबीबाहेर नायलॉनच्या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथे जाळे बसवण्याचे प्रत्यक्ष काम सोमवारी सुरू करण्यात आले.

मंत्रालयात आत्महत्येच्या प्रकाराने गोंधळ
गेल्या काही दिवसांपूर्वी 43 वर्षीय हर्षल रावते या चेंबूरच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली होती, या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचबरोबर, अहमदनगरमध्ये राहणार्‍या 25 वर्षीय अविनाश शेटे या तरुणाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधी दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाने थेट 5व्या मजल्यावर खिडकीच्या बाहेर कठड्यावर उभा राहून शोले टाइपने आत्महत्येचा इशारा दिला.

धर्मा पाटील आत्महत्या!
दरम्यान, 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनीही काही दिवासांपूर्वी मंत्रालय परिसरात विष घेऊन आत्महत्या केली होती. आयसीयूत उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात वारंवार खेटे घालूनही काम होत नसल्याने धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते, अशा प्रकारे आगामी काळातही कुणीही असा प्रकार करू शकते, त्यावरही उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे.