मुंबई । क्रॉस कटिंग करण्याच्या नादात सध्या सरकार भलतेच निर्णय घेत असल्याचे समोर येत आहे. मंत्रालयातील कार्यालयात वापरल्या जाणार्या झेरॉक्स मशीनच्याबाबतही असेच एक फर्मान सरकारने काढले आहे. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांच्या कार्यालयातील झेरॉक्स मशिन अनेक कारणांनी मोठ्या प्रमाणावर नादुरूस्त होत आहेत. या महागड्या मशीनची व्यवस्थित देखभाल नसल्याचे शासनाचे म्हणणे असून मशीनच्या खराब होण्याचे खापर अधिकारी व कर्मचार्यांवर फोडले आहे. यामुळेच झेरॉक्स खराब झाल्यास दुरुस्तीचा खर्च अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पगारातून वसूल केला जाणार असल्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
मशीन नादुरुस्त होत असल्याने उपाय
मंत्री, राज्यमंत्री कार्यालयातील झेरॉक्स मशिन या अत्याधुनिक आणि महागड्या आहेत. या मशीन वारंवार बंद पडत असल्याबाबतच्या तक्रारी मंत्र्यांच्या कार्यालयांकडून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आम्ही महत्वाची कामे करावीत की या मशीनची काळजी घेत बसावे आशा प्रतिक्रिया काही अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी व्यक्त केल्या आहेत.
बेशिस्तपणे मशीन हाताळले जातायेत
झेरॉक्स मशीनचे इतर कप्पे उघडे ठेवल्याने त्यामध्ये उंदिर जावून वायर कुरतडल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने अनेक झेरॉक्स मशीन नादुरुस्त आहेत. मशिन जवळ खाद्यपदार्थ ठेवल्याने झेरॉक्स मशिनच्या आसपास उंदीर, झुरळांचा वावर वाढतो. ट्रे उघडे ठेवू नये, झेरॉक्स प्रती काढल्यावर त्याच ठिकाणी स्टेपल करु नये, अशी काळजी घेण्याबाबतचे आदेश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत तसेच या कारणांमुळे जर झेरॉक्स मशीन खराब झाल्या तर संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनातून खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कार्यालयीन अतिवापराने अथवा सुट्ट्यांच्या दिवशी किंवा कार्यालयात अनुपस्थिती दरम्यान उंदीर किंवा तत्सम कारणाने मशीन खराब झाल्यास आम्ही कसे जबाबदार असणार? असा सवाल काही अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी उपस्थित केला आहे.