मुंबई : कृषिमंत्र्यांना भेटू द्यावे, अन्यथा सातव्या मजल्यावरून खाली उडी मारेन अशी धमकी देत शुक्रवारी दुपारी एका तरुणाने शोले स्टाईल आंदोलन सुरू केल्याने मंत्रालय प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. हा तरूण मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर पोहोचला कसा? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अथक प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले असून यामुळे मंत्रालयाच्या आवारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
तो तरुण उस्मानाबादचा
तो तरुण कोण आहे, तो मंत्रालयात कशासाठी आला होता याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकते. सातव्या मजल्यावरील सज्जावर पोहोचल्यानंतर त्या तरुणाने आपला मोबाईल फोन खाली फेकला, असे सांगितले जाते. तो तरुण उस्मानाबादचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी दुपारी एक तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला. सातव्या मजल्यावर खिडकी बाहेरील सज्जावर तो उभा राहिला.
कृषिमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटू द्यावे
मला कृषिमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटू द्यावे, अन्यथा इथून उडी मारेन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. तरुणाच्या या इशारानंतर सुरक्षा यंत्रणाही कामाला लागल्या. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मंत्रालयात तैनात असलेले पोलीस अधिकारी त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मंत्रालयाजवळ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री रणजित पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडेदेखील घटनास्थळी पोहोचले होते. अखेर या तरूणाला खाली उतरविण्यात यश आले.