मुंबई : मंत्रालयात राज्यभरातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मंत्रालय आणि परिसरात येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंगची कुठलीही व्यवस्था नसल्याने अव्यवस्थित गाड्या लावल्या गेल्याने रस्त्यावर ट्रॅफिक जॅमची मोठी समस्या उभी राहिलेली दिसून येतेय. या ठिकाणी लागल्या जाणाऱ्या गाड्या ह्या मातब्बर नेतेमंडळींच्या असल्याने व्यवस्था लावणारे कर्मचारीही त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसत नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर मंत्रालयासमोरील रस्त्यावर गाड्या लावलेल्या दिसून येतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक व्यवस्था खोळंबल्याचे चित्र दिसून येते.
मंत्रालयात खासकरून सोमवारी आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती असल्याने राज्यभरातून कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा लोंढा मंत्रालयात येतो. यातील अनेक लोक हे आपली चारचाकी गाडी घेऊन मुंबईत येतात मात्र मंत्रालय परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येते. ही समस्या पूर्वापारपासूनची असून यावर कुठलाही निर्णय घेतला जात नसल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.