मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई : प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा (आरसेप ) करार त्वरीत रद्द करावा या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर राजू शेट्टी आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.

आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान व दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसेप) या व्यापार विषयक करारावर आज ( 4 नोव्हेंबर) सह्या करण्यात येणार आहेत. भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहेत. कारण दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत. यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सोमवारी मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केले. तसेच सरकारचा निषेध करत घोषणाबाजीही केली. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार आहे. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या वेळी केली आहे.