मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंबई-मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. धुळ्याचे बबन झोटे यांनी अंगावर रॉकेल घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी देखील मंत्रलायासमोर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

याआधी मंत्रालयात वाढत्या आत्महत्यांमुळे इमारतीच्या लॉबीबाहेर नायलॉनच्या जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मंत्रालय परिसरात तीन वेळा आत्महत्येचे प्रयत्न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.

४३ वर्षीय हर्षल रावते या चेंबूरच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली होती, या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचबरोबर, अहमदनगरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय अविनाश शेटे या तरुणाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

तसेच ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनीही मंत्रालय परिसरात विष घेऊन आत्महत्या केली होती. आयसीयूत उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात वारंवार खेटे घालूनही काम होत नसल्याने धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते.