मंत्रालयाच्या चहूबाजूने उभी राहणार मजबूत सुरक्षा भिंत
निलेश झालटे,मुंबई- राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाची सुरक्षा वाढविण्यावर सरकारचा जोर दिसू लागला आहे. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी आता हायटेक सुरक्षा भिंत बांधली जाणार असून या कामाची सुरुवात पुढील आठवड्यापासून होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे. सध्याची साधारण 8 फूट उंचीची सुरक्षा भिंत तोडून त्या ठिकाणी बारा फुटाची सुरक्षा भिंत उभारली जाणार आहे. या भिंतीला आता आहेत त्याच ठिकाणी मोटराईज गेट आणि सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविले जाणार आहेत. 677 मीटर लांब प्रस्तावित असलेल्या सुरक्षा भिंतीच्या या कामासाठी 3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे.
सीसीटीव्हीची असणार नजर
मंत्रालयात येणारी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने गृह विभागाकडून सध्याचे गेट तोडून नवीन गेट बांधण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देऊन मंत्रालयाभोवती नवीन सुरक्षा भिंत उभारली जाणार आहे. या भिंतीची काँक्रीट वाल 4 फूट आणि त्यावर 2.45 मीटर ग्रील असणार आहे. या कामा अंतर्गतच सध्या असलेल्या गेटच्या ठिकाणी मोटाराईज गेट, सुव्यवस्थित पोलीस चौक्या देखील बनविल्या जाणार आहेत. सोबतच गेटवर गृह विभागाच्या मार्फत सीसीटीव्ही देखील लावले जाणार आहेत.
हे देखील वाचा
आठवड्याभरात कामाला सुरुवात
677 मीटर लांब प्रस्तावित असलेल्या या भिंतीच्या कामासाठी 3 कोटी रुपये खर्च एकूण अपेक्षित आहे. या कामासाठी वर्क ऑर्डर झाले असून निविदा देखील निघाल्या आहेत. या कामासाठी श्रीनाथ इंजिनियरिंगला टेंडर दिले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून एनओसी मिळाल्यानंतर आठवड्याभरात या कामाला सुरुवात होईल. येत्या 12 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती आहे.
मंत्रालयातील खड्डयांचे काय?
राज्यभर खड्डयांवरून राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सेल्फी विथ खड्डा ही मोहीम देखील राबविली जात आहे. मात्र मंत्रालय आणि परिसरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांकडे कुणाचेही लक्ष नाही काय? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. नजीकच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्रालय परिसरात बरीच कामे होत आहेत. विशेषता भिंतीचे रंगकाम केल्याने इमारतींना आकार आला आहे. मात्र परिसरात फार मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, तिथे चांगल्या प्रतीचे फ्लोरिंग करणे गरजेचे आहे.