माथाडी कामगार न्याय्य मागण्यांपासून वंचित
माथाडी कामगारांचे आझाद मैदानावर उपोषण
मुंबई :- अनेक दिवसांपासूनच्या आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेश जाऊन राज्यासाठी निधी आणला. मात्र, माथाडी कामगार हा त्यांच्या न्याय मागण्यांपासून दूर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या अधिकार कक्षेतील गोष्टी माथाडी कामगारांना मिळवून द्याव्यात, अशी मागणी माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी केली.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित प्रश्न आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यासह शेकडो माथाडी कामगार नेते आणि कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.
कामगारांच्या काय आहेत मागण्या
माथाडी सल्लागार समितीची पुर्नरचना करुन अनुभवी कामगार नेत्यांच्या सदस्य म्हणून नेमणुका कराव्या. विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्या.माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे. माथाडी मंडळावर पुर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका कराव्या.महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न शासनाने थांबवावा, अशा मुख्य मागण्या माथाडी कामगारांनी केल्या आहेत.