मंत्रिमंडळातील चेहरेच नाही तर शिवसेना भूमिकाही बदलणार

0

मुंबई : गेली 25 वर्षे भाजपसोबत राजकारणातील हिंदुत्वाच्या झालरीमध्ये लपेटलेला मधुचंद्र संपुष्टात आल्याने शिवसेनेने आता जनाधार वळवून स्वबळावर सत्तेवर येण्याकरिता संघटनात्मक पातळीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे. लवकरच शिवसेना मंत्रिमंडळातील चेहरे बदलताना ग्रामीण भागाला प्राधान्य देणार आहे. महात्मा गांधींनी एकेकाळी गावाकडे चला हा दिलेला संदेश उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक पातळीवर आपल्या आमदारांना, पदाधिकार्‍यांना आदेश स्वरूपात दिला आहे.

वर्षभराच्या कालावधीत राज्यामध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषदा निवडणूक निकालाचा अंदाज पाहता राज्याच्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही भाजपची पाळेमुळे खोलवर रुजत चालल्याची बाब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आली आहे. शिवसेनेच्या दृष्टीने ही एक धक्कादायक बाब असून, हेच चित्र कायम राहिल्यास जे चित्र उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालात पाहावयास मिळाले, त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये नजीकच्या काळात पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. याचीच गंभीर दखल घेत शिवसेना नेतृत्वाने आपल्या आमदारांना, नेत्यांना, उपनेत्यांना व पदाधिकार्‍यांना ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले आहे.

त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मंत्रिमंडळातील शिवसेना मंत्र्यांच्या खांदेपालट करताना ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना सूत्रांकडून देण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांशी फोनवरून चर्चा करून मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सेनेचे मंत्री बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पक्षप्रमुखांनी सध्यातरी सबुरीने घेण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सेना आमदारांबाबत नाराजी आहे. सरकारमधील भूमिकेबाबत सेनेचे मंत्री आणि आमदारांमध्ये मतमतांतर वारंवार दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच सेनेच्या आमदारांनी एका बैठकीत आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. जनतेकडून कर्जमाफीबाबत विचारणा होत आहे. जनतेने आमदारांचे कपडे काढणेच बाकी राहिले आहे, अशा शेलक्या शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांबाबत संताप व्यक्त केला होता.

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. या वेळी पक्षबांधणी, केंद्रातील भूमिका, मतदारसंघातील कामे आणि पुढच्या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी याबाबत चर्चा झाली होती. दरम्यान, पक्षप्रमुखांनी मंत्रिमंडळातील सेनेचे चेहरे बदलण्याचा निर्णय घेतल्यास कोणत्या नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकेकाळी मुंबई, ठाण्यापुरती सीमित असणारी शिवसेना छगन भुजबळांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेली. गाव तिथे शाखा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न खर्‍या अर्थाने छगन भुजबळांनी पूर्ण केले होते. नारायण राणे शिवसेनेत असताना कोकण भगवामय ठेवण्यावरच राणेंनी भर दिला होता. गणेश नाईक शिवसेनेत असताना ग्रामीण भागात शिवसेनेच्या रुग्णवाहिका फिरताना दिसायच्या. नवी मुंबईसह पनवेल, उरण आणि ठाण्यातील काही भागांत तसेच कल्याण-डोंबिवलीतील आगरी पट्ट्यात गणेश नाईकांचा करिश्मा होता. ग्रामीण भागात शिवसेनेचा दबदबा निर्माण करणारे हे नेेते शिवसेना सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसावले आहे. या त्रिमूर्तीच्या तोडीस तोड नेतृत्व शिवसेनेच्या ग्रामीण भागात निर्माण होऊ शकले नाही. काही प्रमाणात दिवाकर रावतेंचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील अन्य नेत्यांना आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर कधी दिंडी तर कधी रॅली काढत रावतेंनी आपली शेतकरी नेता ही प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या शिवसेनेत असलेले मातब्बर नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीत विजयी न झाल्याने शिवसेना नेतृत्वाला त्यांना विधान परिषदेत पाठवून त्यांचे पुनर्वसन करावे लागले आहे. शिवसेनेला वाट्याला आलेल्या मंत्रिपदांमध्ये विधान परिषदेच्याच सदस्यांचा हिस्सा लक्षणीय आहे. भाजपने गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना सत्तेत सहभाग मिळाला आहे, तर शिवसेनेला चौथ्या क्रमाकांवर अनेक भागामध्ये समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता मिळवायची असेल तर ग्रामीण भागातही सेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे आमदार, पदाधिकारी, उपनेते, नेते, संपर्कप्रमुख आदींना आपापल्या ग्रामीण भागावर संघटनात्मक भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरी भागावरच गेल्या काही वर्षांवर लक्ष केंद्रित केल्याने ग्रामीण भागात संघटनेची पीछेहाट झाल्याने पुन्हा एकवार गाव तिथे शाखा हे वादळ घोंघावण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले असून वेळोवेळी ग्रामीण भागातील संघटनात्मक आढावाही उद्धव ठाकरेंकडून घेण्यात येणार आहे.