मंत्रिमंडळात लवकरच पुन्हा नाथाभाऊंचा समावेश?

0

मुंबई (निलेश झालटे) । आरोपांच्या कचाट्यात अडकून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची लवकरच मंत्रिमंडळात वापसी होण्याची शक्यता आहे. झोटिंग समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खडसे यांना क्लीनचिट मिळाल्यास लगोलग त्यांची कॅबिनेटमध्ये वापसी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी संप आणि अन्य अनेक प्रश्नांमुळे विरोधक आणि जनतेने सरकारला घेरलेले असून विरोधकांना उत्तर देण्यासाठी म्हणून मंत्रिमंडळात आ. खडसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची सत्ताधारी पक्षाला उणीव भासत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर आ.खडसे यांच्या मंत्रिमंडळ वापसीची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकार कोंडीत! :  शेतकर्‍यांचा ऐतिहासिक संप आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री वगळता एकाही अन्य मंत्र्यांना सरकारची बाजू प्रभावीपणे मांडता आलेली नाही. यामुळेच की काय मध्यंतरी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना या विषयांवर न बोलण्यास सांगितले असल्याच्या देखील चर्चा होत्या. अशा वेळी ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्यासारख्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात गरज आहे, असे सांगत त्यांची लवकरच वापसी होईल असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
एकाच वेळी आरोपांच्या अनेक फैरी चालल्यामुळे आ. खडसे हे जवळपास एक वर्षांपासून मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. दरम्यान मध्यंतरी आ. खडसे यांनी मध्यावधी निवडणुकांचेदेखील संकेत दिले होते. खडसे यांच्यावर आरोप लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांची अनेकदा पाठराखण केली आहे. जमीन भ्रष्टाचार प्रकरणी झोटिंग समिती चौकशी करत असून लवकरच याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री निर्णय घेतील- आ. खडसे
दरम्यान एकनाथराव खडसे यांच्या मंत्रिमंडळ वापसीबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत अद्याप मला काही माहिती मिळालेली नाही. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. असे होत असेल तर चांगलेच आहे, यामुळे अजून अधिक जोमाने काम करता येईल.