नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्ताराच्या चर्चेदरम्यान मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांना बोलावले होते. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदल व विस्ताराबाबत चर्चा होणार होती. मात्र, आता ही बैठकच रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ८१ मंत्री असू शकतात, त्यापैकी सध्या केवळ ५३ मंत्री आहेत. त्यामुळे २८ नवीन मंत्र्यांसाठी पदे रिक्त आहेत.
मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असून, त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून, त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भाजपा नेत्यांची बैठक बोलावली होती. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि धर्मेंद्र प्रधान, प्रह्लाद जोशी, पियुष गोयल आणि नरेंद्र सिंह तोमर यासारखे अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी होणार होते. मात्र, आता ही बैठकच रद्द करण्यात आली आहे.
मित्र पक्षांनाही स्थान
अनेक भाजपा नेत्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे नेते पशुपती पारस, नारायण राणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.