मुंबई । दीर्घकाळ रेंगाळलेला मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होणार असून यात भाजपच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समजत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्री नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी याबाबत चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच, या बैठकीनंतर मुख्यमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. भाजपच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, असे पक्षाध्यक्ष शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले होते. त्यानुसार आता ही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यादरम्यान मुख्यमंत्री काही अकार्यक्षम मंत्र्यांची माहिती शाह यांना देणार असल्याचे कळते. तसेच, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात घेण्याबाबतही चर्चा होणार आहे.
राज्यातील विद्यापीठांचा ढिसाळ कारभार पाहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कामाविषयी मुख्यमंत्री नाराज आहेत. तावडे यांच्याकडून शिक्षण खाते काढून त्यांना इतर महत्वाचे खाते देण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. तसेच, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री विद्या ठाकूर हे ही मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शेलार यांच्यासह अन्य दोन ग्रामीण भागांतील आमदारांचीही वर्णी या मंत्रिमंडळाच्या विस्तारात लागेल अशी भाजपच्या गोटात चर्चा आहे.