गुजरात निवडणुकीचा फटका; आता नव्या वर्षात संक्रातीचा मुहूर्त
मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे व राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आपला पक्ष समाविष्ट करणारे नारायण राणे यांच्या मंत्रिपदाला शिवसेनेने केलेला जोरदार विरोध, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्माण केलेला दबाव आणि गुजरात राज्यातील विधानसभा निवडणूक यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. या नेत्यांच्या माहितीनुसार, नव्या वर्षात संक्रातीचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवडचे भाजप अध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांना मंत्रिपद निश्चित आहे, आता त्यांचे मंत्रिपदही लांबणीवर पडले आहे, असे सूत्र म्हणाले. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही असल्याचेही सूत्राने सांगितले. भाजपविरोधात असलेले गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकीतील वातावरण पाहाता, पक्षश्रेष्ठी महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळत असल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असल्याचेही सांगण्यात आले.
अमित शहा गुजरात निवडणुकीत बिझी
मुंबईस्थित भाजपच्या वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. तथापि, आता अंतिम निर्णय घेण्याबाबतची चर्चा रखडली आहे. सद्या शहा हे गुजरातमध्ये पूर्णवेळ बिझी असून, इतर विषयांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. त्यामुळे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल 18 डिसेंबरला येणार आहेत. तर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरनंतर सुरु होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला मकर संक्रातीनंतरचा मुहूर्त लागेल, असे भाजपमधील नेत्यांना वाटते आहे.
अन्यथा, भाजपला शिवसेनेसोबतच जुळवून घ्यावे लागणार!
गुजरातमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपनेतृत्व धास्तावलेले आहे. गुजरातचे निकाल चुकीचे व अपेक्षित लागले नाही तर पक्षाला बराच धोरणात्मक बदल करावा लागण्याची चिन्हे आहेत. मोदी-शहांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही तर विरोधकांना मोठे बळ मिळेल; परिणामी 2019 च्या लोकसभेसाठी भाजपला गांभीर्याने पाहावे लागेल. सोबतच पुढीलवर्षी मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीगड राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदी-शहांसाठी गुजरातची निवडणूक फार महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र राज्याबाबत बोलायचे झाल्यास शेतकरी कर्जमाफीवरून शेतकर्यांत नाराजी आहे. रोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी खुलेआम सांगत असल्याने त्यावर शिवसेना काय भूमिका घेते हे महत्त्वाचे ठरू शकते. गुजरातमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही तर भाजप राणेंबाबत आस्ते कदम घेऊन आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्याबाबत भाजपला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. या कारणामुळे राज्यातील फडणवीस सरकारचा विस्तार रखडला जाऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.