मंत्रीपद मिळाले, पण मंत्रालयात जागाच नाही !

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा महिने उलटले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारात आमदारांना राज्यमंत्री पदाचे बक्षीस देण्यात आले. मात्र या मंत्र्यांना मंत्रालयात कार्यालयच मिळालेले नाही. मंत्रीपद मिळाले मात्र मंत्रालयात जागाच नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. या तीन मंत्र्यांमध्ये भाजपाचे रवींद्र चव्हाण, मदन येरावार आणि शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. कार्यालयाअभावी या मंत्र्यांची कुचंबणा होत असून कामे मार्गी लावण्यात अडचणी येत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात झाला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे रवींद्र चव्हाण यांना अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्रीपद मिळाले, तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या पदरात सहकार खाते पडले. मदन येरावार यांना पर्यटनासह इतर काही खात्यांचे राज्यमंत्रीपद लाभले. मंत्रीपद मिळाल्याने या तिघांना आनंद होणे स्वाभाविक होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या तिन्ही राज्यमंत्र्यांना मंत्रालयात स्वतंत्र कार्यालयच मिळालेले नाही.

मंत्रालयात दालन न मिळाल्याने तिन्ही मंत्री नाराज असले तरी भाजपाचे मदन येरावार आणि रवींद्र चव्हाण मूग गिळून आहेत. मात्र शिवसेनेचे गुलाबराव पाटील मात्र कमालीचे नाराज झाले आहे. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपला शिवसैनिकांचा बाणा दाखवत आपली नाराजी मुख्यमंत्री कार्यालयालाही कळवली आहे.

सध्या या तिन्ही मंत्र्यांना आपल्या खात्याचा कारभार विधानभवनातील कार्यालयातून करावा लागत आहे. नागरिकांना मंत्रालयाऐवजी विधानभवन येथे जावे लागत आहे. विधानभवनात प्रवेश मिळविण्यासाठी सामान्य माणसांना खूपच दगदग करावी लागत आहे. राज्यमंत्र्यांनाही कार्यालये नसल्यामुळे अवघडल्यासारखे होत आहे. विधानभवनाचे कार्यालयही अत्यंत छोटे आणि गैरसोयीचे असल्याने तेथे कागदपत्रे कशी ठेवायची, असा प्रश्न या मंत्र्यांना पडला आहे.

मंत्रालयात स्वतंत्र कार्यालय नसल्याने कामकाज कसे करावे, असा प्रश्न आहे. महत्त्वाच्या विषयावर अधिकार्‍यांशी चर्चा करता येत नाही, आपली कामे घेऊन आलेल्या जनतेचे गार्‍हाणे ऐकण्यास अडचण होत आहे, त्यामुळे खूप गैरसोय होते. – गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री