माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा भुसावळात प्रतिटोला
भुसावळ (गणेश वाघ)- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंनी पंतप्रधान होण्यात गैर नाही, त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचा मार्मिक टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलल्यानंतर रविवारी लगावला होता. या अनुषंगाने भुसावळातील उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी मंत्री खडसे यांना याबाबत छेडले असता खडसे म्हणाले की, मंत्री महाजनांनी दिलेल्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करतो, आपल्या दृष्टीने हा विषय आता संपलेला आहे. पक्षात कुठलेही निर्णय पक्षश्रेष्ठीच घेत असतात, असे सांगून महाजनांनी आपला विचार केला हे बरे झाले, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
खडसेंच्या महत्त्वकांक्षेनंतर मंत्री महाजनांचा टोला
शनिवारी भुसावळ येथील कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राज्यात युती तोडण्यात आपण अग्रेसर होतो त्यामुळे राज्यात भाजपाची सत्ता आली व मुख्यमंत्रीही भाजपाचे झाले, असे सांगत विरोधी पक्ष नेता व ज्येष्ठ म्हणून आपणच मुख्यमंत्री व्हायला हवे होते मात्र पक्षाच्या आदेशाने दिलेली जवाबदारी आपण स्वीकारल्याचा गौप्यस्फोट केला होता तर खडसेंची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागावी ही सुप्त इच्छाही त्यातून व्यक्त झाली होती. जलसंपदा मंत्र्यांच्या जाहिरातीत खडसेंचा अत्यंत छोटा आलेला फोटो व त्यांना जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत यशाचे श्रेय न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली नसलीतरी आपण आता श्रेयाच्या उंचीपलीकडचे असल्याचे सांगत अनेक कार्यकर्ते घडवल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांनी मंत्री महाजन यांना छेडले असता त्यांनी खडसेंना पंतप्रधान व्हावे, असेही वाटू शकते, असा मार्मिक टोला लगावत केंद्रात अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री आहेत मात्र अंतिम निर्णय हा पक्षाचा असतो, असे सांगितले होते.