मंत्री पदासाठी तीन गटात रस्सीखेच

एका जागेसाठी दोन दिग्गज आमदार स्पर्धेत

मुंबई (खास प्रतिनिधी) : विश्वासदर्शक ठरावापूर्वी मंत्रीपदाबाबत संघर्ष तीव्र झाला आहे. भाजपात तीन गट मंत्रीपद मिळावे यासाठी सरसावले आहेत. मूळ भाजप आमदार, काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले आमदार आणि आता शिवसेनेतून आलेले बंडखोर अशा तीन गटांनी मंत्री पद मिळण्यासाठी 60 दिग्गजांनी जोर लावला आहे.

तीन गट स्थापन
शिवसेनेत बंड करून काही आमदार बाहेर पडले. भाजपासोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदाची शपथ घेतली. आता नवीन मंत्री मंडळ कसे असेल यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मंत्री पद मिळावे यासाठी भाजपात तीन गट स्थापन झाले आहेत. या गटात मूळ भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेले आमदार, आणि आता शिवसेनेतून बंडखोर बाहेर पडलेले आमदार असे हे तीन गट आहेत.

दिग्गज आमदारांचा समावेश
या तीन्ही गटात अतिशय दिग्गज उमेदवार आहेत. यात साखर सम्राट, सहकार सम्राट, अनेक वर्षे मंत्री राहिलेले, किमान तीन ते पाच वेळा आमदार असलेले अशा दिग्जजांचा समावेश आहे. पैसा, सामाजिक प्रतिष्ठा, साम दाम या सर्व बाबींची युक्त आमदारांची मोठी यादी आहे. अशा परीस्थितीत कोणाला मंत्रिपद द्यावं आणि कुणाला बाहेर ठेवावे ? असा पेच सर्वांना आहे. त्यातही भाजपात देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, मुनगंटीवार अशा गटात विभागणी आहे, तर बंडखोरांमध्ये शिवसेना अपक्ष अशी विभागणी आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी विभागणी आहे त्यामुळे कुणाला डावलणे सोप्प नाही.

मंत्रीपदाच्या रस्सीखेचमध्ये असलेले तीन गट पाहू या

काँग्रेस राष्ट्रवादी मधून आलेले आमदार
हर्षवर्धन पाटील, अमरीषभाई पटेल, विखे पाटील, वैभव पिचड, शिवेंद्र राजे भोसले, राणा जगजीत, विजयकुमार गावीत, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राहुल कुल, कृपाशंकर सिंग असे एकापेक्षा एक नेते आहेत.

भाजपामधूनही अनेक इच्छूक
मूळ भाजपाच्या इच्छूक आमदारांची यादीही मोठी आहे. यात माजी मंत्री यांचा मोठा भरणा आहे. यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुठे, पंकजा मुंडे, राम शिंदे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर, रणजीत सावरकर, प्रवीण पोटे, तुषार भरतील, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसळ, रवींद्र चव्हाण, आशीष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, अतुल सावे, महेश लांडगे, अशोक उईके, किसन कथोरे यांचा समावेश आहे.

कुणीही माघारीसाठी तयार नाही
शिवसेनेमधून फुटून आलेल्या बंडखोर आमदार तसेच अपक्ष आमदार यात मंत्री आणि तीनपेक्षा अधिक वेळा प्रतिनिधित्व केलेल्या आमदारांची यादी ही मोठी आहे. यात कोणी माघार घेईल अशी स्थिती नाही. बच्चू कडू, अब्दुल सत्तार, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संदीपन भुमरे, दादा भुसे, शंभूराजे देसाई, राजेंद्र इंद्रावकर, तानाजी सावंत, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक, चिमणराव पाटील, बालाजी किणीकर, भारत गोगावले, चंद्रकांत पाटील, संजय शिरसाठ, संजय राठोड, सदा सरवणकर, महेंद्र दळवी, प्रकाश अबीतकर , संजय रायमूलकर अशी मोठी यादी आहे. हे आमदार असे आहेत जे आधी कॅबिनेट अथवा राज्यमंत्री झाले आहेत त्यामुळे ते महामंडळावर समाधानी राहतील अशी सुतराम शक्यता नाही त्यामुळे मंत्री मंडळ नाही तर क्रीम महामंडळ यावर मोठी स्पर्धा आहे. ही कसरत करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कसोटी पणाला लागणार आहे.