मंत्री होऊन भगवान गडावर दर्शनासाठी या; धनंजय मुंडेंना निमंत्रण

0

मुंबई : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन करण्यात आले आहे. सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना भगवानगडावर दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ज्या भगवानगडावरुन हलवण्यात आला, त्याच गडावर आता धनंजय मुंडे यांना निमंत्रण गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर फोटो टाकत निमंत्रण दिलायची माहिती दिली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे एकदा गडावर गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. यानंतर गडावर कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही, अशी भूमिका घेत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर होणारा दसरा मेळावा बंद केला.

नामदेव शास्त्रींच्या विरोधानंतर पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला. त्यानंतरच्या वर्षातही नामदेव शास्त्रींचा विरोध कायम राहिला. परिणामी पंकजा मुंडे या गडावर खाली उतरल्या आणि त्यांनी संत भगवान बाबा यांचं जन्मगाव सावरगावात दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दरवर्षी दसऱ्याला भगवानगडावरुन संबोधित करायचे. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थक गडावर यायचे. पण गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद झाले.