मुंबई । सभागृहाचे कामकाज सुरू असताना त्या खात्याचे मंत्रीच हजर नसतात या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी तीव्र आक्षेप घेतला, पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरू होत असताना ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून देण्यासाठी अजितदादा पवार यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सर्वांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.
सरकारने कारभार रेटून नेऊ नये
काल सभागृहाचे कामकाज उशिरापर्यंत चालले. एक बिल पास करण्याचे काम सभागृहात सुरू होते. बिल पास करत असताना प्रत्येक सदस्यांना त्यावर बोलायचे होते. काही सदस्यांना काल बोलू दिले नाही. भावनेच्या भरात आमदार बच्चू कडू यांनी राजदंड उचलला. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने कोणत्याही गोष्टीत घाई करू नये. सदस्यांना बिलावर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. सरकारने कारभार रेटून नेऊ नये. सभागृहाचे तारतम्य ठेवावे, असे राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील म्हणाले.
मुद्दे लिहून घेणं बंद करा
सभागृहात सदस्य पोटतिडकीने मुद्दे उपस्थित करतात आणि मंत्रीच हजर नसतात. मग अदृश्य गॅलरीत कोणीतरी बसून ते मुद्दे लिहून घेतात, हे मुद्दे लिहून घेणं प्रथम बंद करा, असा आक्षेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवला. कामकाज लाइव्ह टेलिकास्ट होतोय, कराडमध्ये बसूनही मुद्दे नोंदवून घेता येतात मग सभागृह कशाला, असे ते म्हणाले.
उत्तर देताना सदस्य नसतात
या उलट मत रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी नोंदवले. जेव्हा महत्त्वपूर्ण चर्चेचे उत्तर आम्ही सभागृहात देतो तेव्हा समोरच्या बाकावर सदस्यच उपस्थित नसतात, मग त्यांचे काय? असे ते म्हणाले. जे सदस्य उपस्थित नसतील त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दिलीप वळसे पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनीही या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले.
कामकाज संपल्याच्या घोषणेनंतरही सभागृह चालते
काल रात्री सभागृहात गंभीर प्रकार घडला. विधानसभेचे कामकाज अध्यक्षांनी संपले असल्याचे घोषित केले. मात्र, संसदीयकार्य मंत्री आले आणि सभागृह पुन्हा सुरू करण्यात आले. हे सभागृहाच्या नियमात बसत नाही. सभागृहाचे कामकाज गांभीर्याने सुरू नाही. विरोधी पक्षांचे आणि सत्ताधारी पक्षांचे 293चे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनुदान मागणीवर सदस्य बोलतात तेव्हा कॅबिनेट मंत्री उपस्थित नसतात. सरकारमधील लोकच गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे. सदस्य बोलत असताना कॅबिनेट मंत्री बसवावेत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.