आमदार विक्रम काळे यांनी सरकारला करुन दिली आठवण
हे देखील वाचा
नागपूर – अ व ब वर्गातील केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करुन मान्यता घेण्यात येईल असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्र्यांनी देवून दोन अधिवेशन लोटली तरीसुध्दा निर्णय घेतला नसल्याची बाब आमदार विक्रम काळे यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहासमोर आणली. राज्यात सामाजिक न्याय विभागातंर्गत २८८ केंद्रीय आश्रमशाळांना मान्यता देण्याबाबत, त्यांची तपासणी करुन त्यांची अ,ब, क व ड अशी वर्गवारी केल्यानंतर त्यांना शासनाने अनुदान दयावे यासाठी मराठवाडयातील शिक्षक लोकप्रतिनिधींनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.
शेवटी सामाजिक न्यायमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवून मान्यता घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला आता अधिवेशनाचे दोन टर्म झाले तरी मान्यता मिळाली नसल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी आज उपस्थित केला आणि ही खेदाची बाब असल्याचेही स्पष्ट केले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील केंद्रीय आश्रमशाळा अनुदान देण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे आणि घेणार आहे याचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी केली.